सभासदत्व वारस हक्काचा निर्णय कौटुंबिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 19:12 IST2017-08-14T19:08:34+5:302017-08-14T19:12:07+5:30

सभासदत्व वारस हक्काचा निर्णय कौटुंबिक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत सध्या पंचवार्षिक निवडणुकांच्या निमित्ताने ऐरणीवर आलेला वारसा परंपरेने मिळणाºया सभासदात्वाचा मुद्दा लक्षवेधी ठरला. काही सभासदांनी या मुद्द्यावर सभासदाच्या मृत्यूपूर्वीच त्याने प्रतिज्ञापत्रद्वारे वारसदार ठरवावा, अशी सूचना केली. तर काहींनी सभासदाने मृत्यूपत्राच्या माध्यमातून सभासदत्वाचा वारसदार निश्चित करावा, अशी सूचना केली. मात्र, सभासदाचा वारसदार ठरविणे हा प्रत्येक सभासदाच्या कुटुंबातील खासगी विषय असून, वारसा सभासदत्वाचा निर्णय कौटुंबिक चर्चेतूनच व्हावा, असे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले आहे.
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यकारी मंडळाच्या सूचनेवरून संस्थेचे अध्यक्ष प्रताप सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि. १४) पार पडलेल्या या वार्षिक सभेत किरकोळ मतभेद आणि आरोप- प्रत्यारोप वगळता सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.