चौधरी प्लाझातील अनधिकृत बांधकामांवर मनपाचा हातोडा
By Admin | Updated: January 12, 2016 00:24 IST2016-01-12T00:22:23+5:302016-01-12T00:24:22+5:30
कारवाई : रहिवाशांनी केले वाढीव बांधकाम

चौधरी प्लाझातील अनधिकृत बांधकामांवर मनपाचा हातोडा
नाशिक : सिडको परिसरातील राणेनगर भागातील चौधरी प्लाझा या इमारतीत फ्लॅटधारकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी हातोडा चालविला. जवळपास सुमारे २० फ्लॅटधारकांनी वाढीव पक्के बांधकाम केले असल्याने महापालिकेला सदर कारवाई आणखी दोन-तीन दिवस राबवावी लागणार आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आठवडाभर थांबविलेली मोहीम पुन्हा सुरू केली. पथकाने राणेनगर परिसरातील चौधरी प्लाझा या इमारतीतील अनधिकृत बांधकामांवर तक्रारीवरून कारवाई केली. सोमवारी महापालिकेच्या पथकाने चौधरी प्लाझातील वाढीव बांधकामांवर जेसीबी चालविला. विनोद नायर यांनी बाल्कनीचे अनधिकृत बांधकाम केले होते, शिवाय पत्रे टाकून टेरेस बंद केले होते. पथकाने सदर बांधकाम हटविण्याची कारवाई केली. ज्योती शिंदे यांच्याही घरातील पक्के बांधकाम आणि आनंद माळी यांनी पोर्चमध्ये केलेले वाढीव बांधकाम हटविण्यात आले. चौधरी प्लाझा या इमारतीत सुमारे २० फ्लॅटधारकांनी वाढीव बांधकाम केल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. महापालिकेकडे आरसीसी स्वरूपाचे पक्के बांधकाम हटविण्यासाठी मशिनरी नसल्याने आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळही उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या पथकाची पक्के बांधकाम हटविताना दमछाक झाली. त्यामुळे, उर्वरित अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी महापालिकेला आणखी दोन-तीन दिवस मोहीम चालू ठेवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)