एसटी महामंडळाच्या नफ्यांच्या मार्गावर महापालिकेचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST2021-06-16T04:19:41+5:302021-06-16T04:19:41+5:30
पाच ते सहा वेळा फेटाळलेला शहर बससेवेचा प्रस्ताव अखेरीस महापालिकेच्या गळ्यात मारण्यात राज्य परिवहन महामंडळ आणि राज्यातील या पूर्वीचे ...

एसटी महामंडळाच्या नफ्यांच्या मार्गावर महापालिकेचा डोळा
पाच ते सहा वेळा फेटाळलेला शहर बससेवेचा प्रस्ताव अखेरीस महापालिकेच्या गळ्यात मारण्यात राज्य परिवहन महामंडळ आणि राज्यातील या पूर्वीचे फडणवीस सरकार यशस्वी झाल्यानंतर, आता जुलै महिन्यापासून ही सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. वर्षाकाठी सुमारे ३५ काेटी रुपयांचे नुकसान होणार असल्याने, महापालिकेने आत्तापासून या संदर्भात खबरदारी घेण्यास प्रारंभ केला आहे. केवळ महापालिका क्षेत्रात ही सेवा चालवून फायदेशीर ठरणार नसल्याने, महापालिका हद्दीबाहेरील क्षेत्रात २० किलोमीटर परिघातही सेवा देण्यात येणार आहे. महापालिकेने ओझर, त्र्यंबक, देवळाली कॅम्प अशा मार्गांवर बससेवेचा प्रस्ताव अगोदरच घोषित केला आहे. मात्र, त्याचबराेबर शुक्रवारी (दि.११) झालेल्या बैठकीत ही सेवा कसाऱ्यापर्यंत नेण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना यामुळे काहीसा धक्का बसला आहे.
त्र्यंबकेश्वर हे धार्मिक स्थळ असून, त्या ठिकाणी महामंडळाची सेवा फायदेशीर आहे. पंचवीस ते तीस बस त्या ठिकाणी धावतात. नाशिक कसारा हाही महामंडळाचा अत्यंत फायद्याचा मार्ग आहे. त्यावरही निरंतर बस सुरू असतात. मात्र, हे देान्ही मार्ग ताब्यातून गेल्यास महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे हे मार्ग देण्यास महामंडळ उत्सुक नाही. जुलैपासून महापालिकेने बससेवा सुरू केल्यानंतर, या मार्गांवर सेवा सुरू केल्यास महामंडळ, त्यावर आक्षेप घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इन्फो...
दोन्ही ठिकाणची सेवा नियमबाह्य
त्र्यंबकेश्वर आणि कसारा या मार्गावर बससेवा सुरू करण्याचा मानस असला, तरी सध्या केवळ वीस किलोमीटर अंतरासाठीच महापालिकेला परवानगी आहे. नाशिक-त्र्यंबक हे अंतर २८ किलोमीटर अंतर आहे, तर नाशिक-कसारा हे अंतर ६५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हे दोन्ही मार्ग महापालिकेच्या अखत्यारित येत नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.