शंभर व्यापाऱ्यांची खाती महापालिकेने सील
By Admin | Updated: December 2, 2014 01:45 IST2014-12-02T01:38:45+5:302014-12-02T01:45:01+5:30
शंभर व्यापाऱ्यांची खाती महापालिकेने सील

शंभर व्यापाऱ्यांची खाती महापालिकेने सील
नाशिक : एलबीटीचे विवरण भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणखी सुमारे शंभर व्यापाऱ्यांची खाती महापालिकेने सील केली आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत कारवाई झालेल्या व्यापाऱ्यांची संख्या १८० पर्यंत पोहोचली आहे. पालिकेच्या कारवाईमुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांपैकी अनेकांनी पालिकेकडे धाव घेतली असून, २१ व्यापाऱ्यांनी दंडात्मक कारवाईला सामोरे जात विवरणपत्रदेखील सादर केले आहेत.एलबीटी लागू झाल्यानंतर तो व्यापाऱ्यांनी आपल्या उलाढालीवर आधारित असल्याने स्वयंमूल्यमापन करून भरावा आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील तीन महिन्यांत म्हणजेच जून महिन्यापर्यंत आर्थिक विवरणपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही विवरणपत्र न भरणाऱ्यांना महापालिकेने पहिली नोटीस पाठविली आणि विवरणपत्र सादर करण्यास मुदत दिली. त्यानंतरही विवरणपत्र न भरणाऱ्यांना पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई म्हणून करण्यासंदर्भात नोटिसा देण्यात आला; परंतु त्याचीही दखल न घेणाऱ्यांवर आता थेट बॅँक खाते सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ७९ व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करून पालिकेने व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी केली. त्यापाठोपाठ आता पुन्हा सोमवारी शंभर व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्यात आली आहे. पालिकेने कडक पाऊले उचलल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या ७९ व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील केली त्यापैकी २१ व्यापाऱ्यांनी पालिकेला पाच हजार रुपयांचा दंड भरला आणि विवरणपत्रेही सादर केल्याची माहिती एलबीटी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली. (प्रतिनिधी)