जिल्हा प्रशासनाचा आरोप महापालिकेने फेटाळला

By Admin | Updated: March 2, 2017 01:28 IST2017-03-02T01:28:36+5:302017-03-02T01:28:49+5:30

नाशिक : महापालिका निवडणुकीतील मतदार याद्यांमधील घोळप्रकरणी जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनाकडे बोट दाखविल्यानंतर महापालिका आयुक्तांनी सदर आरोप फेटाळून लावला

The municipal corporation rejected the charge of the district administration | जिल्हा प्रशासनाचा आरोप महापालिकेने फेटाळला

जिल्हा प्रशासनाचा आरोप महापालिकेने फेटाळला

नाशिक : महापालिका निवडणुकीतील मतदार याद्यांमधील घोळप्रकरणी जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनाकडे बोट दाखविल्यानंतर महापालिका आयुक्तांनी सदर आरोप फेटाळून लावला असून, मतदार याद्या बरोबर असल्याचा दावा केला आहे. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या मतदार यादीतील पत्त्यांच्या आधारेच प्रभागनिहाय फोड करण्यात आल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट करत जिल्हा प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलले आहे.
राज्यभरातील जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांतील घोळप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे अंगुलीनिर्देश केला होता. जिल्हा प्रशासनाने सुपूर्द केलेल्या मतदार याद्या फोडताना आणि त्यांची प्रभागनिहाय रचना करताना चूक केल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाची बाजू मांडण्यात आली होती. त्याबाबत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांना पत्रकारांनी विचारणा केली असता आयुक्तांनी महापालिकेने प्रभागनिहाय तयार केलेली मतदार यादी बरोबर असल्याचा दावा करत त्यात कोणत्याही प्रकारची चूक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. याउलट, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मतदार याद्यांमधील मतदारांच्या पत्त्यांच्या आधारेच प्रभागनिहाय विभाजन करण्यात आल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे. महापालिकेने प्रारूप मतदार यादी तयार करून त्याबाबत हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यावेळी सुमारे ६५० हरकती दाखल झाल्या होत्या, तर त्यातील ३५० हरकती निकाली काढण्यात आल्या होत्या. मतदार याद्यातील सुधारणांसाठी पुरेसा अवधी देण्यात आला होता. त्यामुळे नंतर त्याबाबत तक्रारी करण्यात अर्थ नसल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The municipal corporation rejected the charge of the district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.