महापालिकेचे अंदाजपत्रक पहिल्यांदाच संगणकीय प्रणालीनुसार तयार
By Admin | Updated: February 21, 2015 02:03 IST2015-02-21T02:03:14+5:302015-02-21T02:03:45+5:30
महापालिकेचे अंदाजपत्रक पहिल्यांदाच संगणकीय प्रणालीनुसार तयार

महापालिकेचे अंदाजपत्रक पहिल्यांदाच संगणकीय प्रणालीनुसार तयार
नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ चे अंदाजपत्रक पहिल्यांदाच शासनाच्या ईआरपी (एंटरप्राईजेस रिसोर्स प्लॅनिंग) संगणकीय प्रणालीनुसार तयार करण्यात आले असून, या प्रणालीमुळे उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीवर अंदाजपत्रक सादर करताना सांगितले.आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले, ईआरपी संगणकीय प्रणालीअंतर्गत महापालिकेच्या मुख्यालयासह सहा विभागात विविध पे सेंटरकरिता सांकेतांक संगणक कोड देण्यात आलेले आहेत. यापूर्वी सर्व स्विमिंग पूलकरिता एकच संगणक कोड ग्राह्य धरून अंदाजपत्रकात आकडेवारी नमूद करण्यात येत होती. परंतु नवीन ईआरपी प्रणालीनुसार प्रत्येक स्विमिंग पुलकरिता स्वतंत्र कॉस्ट सेंटर दर्शविण्यात येणार असून, त्यातून मिळणारा महसूल व त्यावर होणारा विविध बाबींवर खर्चदेखील स्वतंत्रपणे दर्शविण्यात येणार आहे. मात्र, याकरिता प्रत्येक कॉस्ट सेंटर निहाय (उदा. स्विमिंग पूल) लागणाऱ्या खर्चाचा हिस्टॉरिकल डेटा उपलब्ध होत नाही. त्यामुळे नव्याने कॉस्ट सेंटर निहाय अंदाजपत्रकात जमा आणि खर्चात कॉस्ट सेंटरपासून मिळणारे नेमके उत्पन्न व त्यावर लागणारा नेमका खर्च अचूकरित्या निर्धारित करणे कठीण आहे. अशावेळी ईआरपी कोड निहाय करण्यात आलेले कॉस्ट सेंटर व लागणारा खर्च उदा. स्विमिंगपूलमध्ये फेरबदल करण्याची आवश्यकता वेळोवेळी पडू शकते. त्याकरिता असे बदल वेळीच करण्याकरिता कलम १०३ अन्वयेचे अधिकार आयुक्तांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून एखादे कॉस्ट सेंटरकरिता अधिक तरतुदीची आवश्यकता पडल्यास इतर कॉस्ट सेंटरवरून वळती करून आधीच्या कॉस्ट सेंटरला देणे शक्य होईल. त्याचप्रमाणे एका लेखाशिर्षातील रक्कम दुसऱ्या लेखाशिर्षातदेखील आयुक्तांच्या सहमतीने देता येऊ शकेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सदर प्रणालीचा वापर हे यंदाच्या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट असल्याचेही डॉ. गेडाम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)