मुंबईतील ‘बालां’मुळेच फुटले बॅचरल पार्टीचे बिंग
By Admin | Updated: March 30, 2017 00:50 IST2017-03-30T00:50:33+5:302017-03-30T00:50:46+5:30
नाशिक : इगतपुरीनजीक प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेली बॅचलर पार्टी मुंबईतील बारबाला आणि डान्सबारचालक यांच्यात फिस्कटलेल्या आर्थिक व्यवहारामुळेच उधळली गेल्याची माहिती पुढे येत आहे.

मुंबईतील ‘बालां’मुळेच फुटले बॅचरल पार्टीचे बिंग
नाशिक : इगतपुरी शहरानजीक असलेल्या एका प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेली बॅचलर पार्टी मुंबईतील बारबाला आणि डान्सबारचालक यांच्यात फिस्कटलेल्या आर्थिक व्यवहारामुळेच उधळली गेल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी घटनास्थळावरून आणखी एक संशयास्पद कार ताब्यात घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी घोगरे यांनी इगतपुरीस भेट देऊन आढावा घेउन चौकशीच्या सूचना दिल्या. तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली रिसोर्ट परिसरातील एका बंगल्यावर इगतपुरी पोलिसांनी रविवारी रात्री धाड टाकून बॅचलर पार्टी करणाऱ्या चार युवतींसह तेरा जणांना अटक केली होती. मद्यधुंद तरुणांसह अर्धनग्न बारबालांनी चालविलेल्या धिंगाण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर बुधवारी पोलिसांनी नाशिक येथून लाल रंगाची एम. एच.-१५- एफ. एम.- ५००१ क्रमांकाची आणखी एक संशयास्पद कार चौकशीसाठी ताब्यात घेतली. संशयित पृथ्वीराज पवार याने ही कार वापरल्याचे सांगण्यात येते. ही चारचाकी अरुण घुले (रा. गिरणारे, ) यांच्या नावावर असून गाडी मालकाची देखील चौकशी करण्यात येणार आहे. या ठिकाणी पार्टीसाठी आलेल्या युवकांनी मुंबईतील एका डान्सबार मधील बारबालांशी संपर्क साधत पार्टी निश्चित केली. पार्टी करणाऱ्यातील एका तरुणाचा विवाह ठरल्याबद्दल पार्टी आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. नेहमीचा बार सोडून संबधीत बारबाला या ठिकाणी आल्याने बार चालकाशी त्यांचा वाद झाला. आपले आर्थिक नुकसान होण्याची बार चालकास चिंता होती. त्यामुळेच बार सोडून न जाण्याचा आग्रह त्याने धरला. त्यास प्रतिसाद न देता बारबाला पार्टीस गेल्याने बारचालकानेच ‘टिप’ देऊन या पार्टीचे बिंग फोडल्याची चर्चा दिवसभरात होती. (प्रतिनीधी)
बड्या बापांची नावे गुलदस्त्यातच
बॅचरल पार्टीतील सात तरूणांवर गुन्हे नोंदवले गेले असले तरी त्या व्यतिरिक्त प्रशासकीय व पोलिस अधिकारी असणाऱ्या बड्या बापांच्या मुलांचाही यात सहभाग राहिल्याची व त्यांची नावे वगळल्याची चर्चा कायम असून याबाबत अधिकृतरित्या कुणाकडूनही दुजोरा मिळू शकलेला नाही. राजकीय व अधिकारीक पातळीवरील दबावातून ही नावे वगळल्याचे बोलले जात असून त्यामुळे पोलिसांची भुमीका संशयास्पद ठरली आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्वाधिक मुले ही बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची असल्याने तिथे दिवसभर चर्चा होती़ तर काही कार्यालयांमध्ये आपापल्या परीने यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याची मुले असतील याबाबत चर्चा करीत होते़
उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची मुले
मिस्टिक व्हॅली प्रकरणात बांधकाम विभागातील अधिकारी तसेच आयएएस अधिकाऱ्यांची मुले तसेच आयपीएस अधिकाऱ्याच्या जावयाचा समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे़ नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलेले व कोट्यवधींची संपत्ती जप्त करून अपसंपदेचा गुन्हा दाखल असलेल्या मुख्य अभियंत्यासोबत काम केलेल्या दोन अधिकाऱ्यांची मुले, औरंगाबादच्या एका व पुणे येथील दोन अधिकाऱ्यांची मुले, नंदुरबारच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ, तसेच नाशिक परिक्षेत्रात कर्तव्य बजावलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जावयाचाही समावेश या बॅचलर पार्टीत होता़, असेही बोलले जात आहे.