Muharram discourse: The message of truth and humanity from 'Karbala' | मुहर्रम प्रवचनमाला : ‘करबला’मधून सत्य अन् मानवतेचा संदेश

मुहर्रम प्रवचनमाला : ‘करबला’मधून सत्य अन् मानवतेचा संदेश

ठळक मुद्दे‘इमामशाही’त मानाचा ताबूत‘यादे करबला’ या प्रवचनमालांचे ठिकठिकाणी आयोजन

नाशिक : सत्य आणि मानवतावादी तत्त्वांच्या संरक्षणार्थ इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू शहीद-ए-आजम हजरत इमाम-ए-हुसेन यांनी स्वत:सह आपल्या कुटुंबीयांच्या प्राणांची आहुती दिली. मानवतावाद हा सर्वश्रेष्ठ असल्याचा संदेश त्यांनी ‘करबला’ येथील बलिदानातून दिला आहे, असा सूर जुने नाशिक, वडाळागाव परिसरात सुरू असलेल्या दहा दिवसीय मुहर्रमच्या प्रवचनमालांमधून उमटला. मुहर्रमच्या प्रवचनमालांची मंगळवारी (दि.१०) सांगता होणार असून, मुस्लीम बांधव ‘आशुरा’चा दिवस पाळून विशेष नमाजपठण करणार आहेत.
हजरत इमाम-ए-हुसेन यांच्यासह करबलाच्या मैदानात हौतात्म्य पत्कारणाऱ्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी मुहर्रमचे सुरुवातीचे दहा दिवस ‘यादे करबला’ या प्रवचनमालांचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते. यावर्षीदेखील मोठ्या संख्येने जुने नाशिक, वडाळागाव परिसरात प्रवचनमाला सुरू आहेत. या प्रवचनमालांमध्ये धर्मगुरूंकडून करबलाचे युद्ध, त्यामागील उद्देश, हेतू आणि शिकवणीविषयी प्रकाशझोत टाकला जात आहे. महिलांसाठी स्वतंत्ररीत्या प्रवचनमाला आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिला धर्मगुरूंकडून मार्गदर्शन केले जात आहे. वडाळागावातील तैबानगर मदरसा, मदिनानगरमधील मदरसा नुरूल ऐन, जय मल्हार कॉलनी उद्यान, वडाळारोडवरील इमाम अहमद रजा लर्निंग सेंटर, जुने नाशिकमधील अब्दुल गनी हॉल यांसह आदी ठिकाणी महिलांसाठी खास प्रवचनमाला मागील रविवारपासून (दि.१) सुरू आहेत. तसेच पुरुषांसाठी जुने नाशिकमधील कोकणीपुरा येथील रजा चौक, बागवानपुरा चौक, वडाळारोडवरील चिश्तिया कॉलनी, वडाळागावातील गौसिया मशिद कबरस्तान परिसरात प्रवचनमाला सुरू आहेत. यामध्ये मौलाना मुफ्ती हनीफ कानपुरी, मौलाना शाकीर रजा, मौलाना मुफ्ती जुबैर अख्तर यांचे प्रवचन सुरू आहे.

घराघरांत फातिहा पठण
आशुरादिनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून मुस्लीम बांधवांकडून घराघरांमध्ये विशेष खाद्यपदार्थ तयार करून फातिहापठण करण्यात येत आहे. मंगळवारी मुहर्रमच्या आशुरानिमित्त सकाळ-सायंकाळी मुस्लीम बांधव खिचडी, सरबत तयार करून फातिहा पठण करणार आहेत. तसेच शहरातील विविध मशिदींमध्ये  ‘आशुरा’च्या खास नमाजचे पठण व प्रार्थना करण्यात येणार आहे.

‘इमामशाही’त मानाचा ताबूत
सारडासर्कल येथे सालाबादप्रमाणे शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार यावर्षीदेखील मानाचा ताबुत सय्यद कुटुंबीयांकडून उभारण्यात आला आहे. या ताबुताचे वैशिष्ट म्हणजे पूर्णत: पर्यावरणपूरक. बांबूच्या कामट्या आणि कापूसचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ताबुतावर अळीवच्या बिया कापसामध्ये पेरल्या जातात. दहा दिवस पाण्याची फवारणी केली जाते. हिरवळीने हा ताबूत बहरलेला पहावयास मिळतो.

Web Title: Muharram discourse: The message of truth and humanity from 'Karbala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.