साधुग्राममधील रस्त्यावर चिखल; चालणे मुश्किल
By Admin | Updated: September 20, 2015 23:24 IST2015-09-20T23:24:00+5:302015-09-20T23:24:32+5:30
साधुग्राममधील रस्त्यावर चिखल; चालणे मुश्किल

साधुग्राममधील रस्त्यावर चिखल; चालणे मुश्किल
नाशिक : तिसऱ्या पर्वणीपासून पाऊस सुरू झाल्याने साधुग्राममधील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. वाहन चालविणे तर दूरच या रस्त्यावरून पायी चालणेही मुश्किल झाले आहे. सेक्टर दोनमध्ये रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यावर खडी टाकण्याचे काम सुरू आहे.
साधुग्राममधील सेक्टर दोनमधील कपिला संगमाकडे येणाऱ्या रस्त्यावर चिखल साचल्याने वाहनधारकांनी वाहतुकीसाठी पर्यायी इतर मार्गांचा वापर सुरू केला आहे. खालशांनी सामान आवरण्यास सुरुवात केल्याने अवजड वाहन काढणे या रस्त्यावरून अवघड झाल्याने साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे. खालशातील अवजड साहित्य बाहेर काढण्यासाठी भरपावसात काम करावे लागत आहे. त्यात साहित्याने भरलेले वाहन महामार्गाला काढण्यासाठी साधुग्राममधील कुठल्या रस्त्याने बाहेर निघावे हा प्रश्न वाहनधारकांना पडतो. रामसृष्टीतील रस्त्यावर पाण्याचे डबके साचले आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने खालशातील सामान आवरण्यासाठी साधूंच्या भक्ताचे हाल होत आहेत. बस्तान भरल्यानंतर वाहन साधुग्राममधून काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे आजाराचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)