खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुढे ढकलावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST2021-06-09T04:18:19+5:302021-06-09T04:18:19+5:30
नाशिक - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असून खासदार संभाजीराजे व विनायक मेटे यांनाही एकत्र ...

खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुढे ढकलावे
नाशिक - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असून खासदार संभाजीराजे व विनायक मेटे यांनाही एकत्र आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे नमूद करत खासदार संभाजीराजेेंनी कोल्हापूरमधून १६ जूनपासून पुकारलेले आंदोलनही पुढे ढकलावे, अशी त्यांना विनंती करणार असल्याचे भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी (दि.७) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपतर्फे सोमवारी (दि.७) मराठा आरक्षणासंदर्भात पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बैठकीत आंदोलनाच्या भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगतानाच समाजाच्या सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे, विनायक मेटे यांनाही एकत्र आणण्याचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट करतानाच समाजाची सगळी ताकद एकत्रित आणू शकलो तर ते गरजेच असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सरकारमध्ये विसंवाद असून आरक्षणासंदर्भात समाजाला सांगण्यासाठी कोणतेही मुद्देच नाहीत त्यामुळेच आंदोलनाची भूमिका घेण्याची वेळ आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
इन्फो -
समाजात फूट पाडण्याचा आरोप
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करतानाच पदोन्नती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजातील नेत्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा, असे मत व्यक्त केले आहे. समाजातील आमदार, खासदारांनी एकत्र येणे आवश्यक असल्याची अशी भूमिका व्यक्त करतानाच यासंदर्भात दोन दिवसांतच संभाजीराजेंशीही चर्चा करून त्यांनी राज्यातील संघटनांच्या एकत्रित बैठकीला येण्यासाठी विनंती करणार करणार असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.