मातेच्या कुशीतून : पळविलेले बालक सापडले जंगलात दापुरेत नरबळीचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:19 IST2018-05-05T00:19:09+5:302018-05-05T00:19:09+5:30
घोटी/त्र्यंबकेश्वर : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडले.

मातेच्या कुशीतून : पळविलेले बालक सापडले जंगलात दापुरेत नरबळीचा प्रयत्न फसला
घोटी/त्र्यंबकेश्वर : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडले. या घटनेमागे नरबळीसाठी तर बालक पळविले नसावे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर काही वस्तू आढळल्या आहेत. सदर बालकावर त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दापुरे येथील पाचकुंडल्याची वाडी या आदिवासी वस्तीवरील मंगल चौधरीनामक महिला आपल्या चिमुकल्याला कुशीत घेऊन झोपली असता, रात्री २ वाजेच्या सुमारास तिच्या कुशीतील बालक अज्ञातांनी चोरून नेले. दरम्यान या मातेला जाग आली असता, आपल्याजवळ बाळ नसल्याचे समजताच तिने हंबरडा फोडला. यावेळी घरातील सर्व सदस्य जागे झाले. त्यांनी बाळाचा सर्वत्र शोध घेतला असता हे बालक जंगलात मिळून आले. या बालकाला आणि मातेला उपचारार्थ त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकाराची माहिती समजताच श्रमजीवी
संघटनेचे भगवान मधे यांनी मातेची आणि बालकाची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात व परिसरात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असून, यामुळे नरबळी देण्याच्या घटनांत काही दिवसात वाढ झाली आहे. हा प्रकारही नरबळीसाठी केला नसावा ना याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केली आहे. ज्या ठिकाणी हे बालक सापडले त्या ठिकाणापासून काही अंतरावर कोंबडीचे पिलू, नारळ, वाटी असे साहित्यदेखील आढळून आले.