फस(व)लेल्या सापळ्याचीच चर्चा अधिक
By Admin | Updated: March 29, 2017 00:55 IST2017-03-29T00:55:36+5:302017-03-29T00:55:55+5:30
नाशिक : गोष्ट खरी आहे की नाही याचा उलगडा होऊ शकला नसला तरी, जी काही चर्चा महसूल व लाचलुचपत प्रतिबंधक विभागात होत आहे त्यात तथ्य असण्याची शक्यताही नाकारता येऊ नये.

फस(व)लेल्या सापळ्याचीच चर्चा अधिक
श्याम बागुल : नाशिक
गोष्ट खरी आहे की नाही याचा उलगडा होऊ शकला नसला तरी, जी काही चर्चा महसूल व लाचलुचपत प्रतिबंधक विभागात होत आहे त्यावरून काही अंदाज बांधता येणारे आहेत व त्यात काहीअंशी तथ्य असण्याची शक्यताही नाकारता येऊ नये. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याभोवती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला, परंतु या सापळ्यातून महसूल अधिकारी लिलया निसटला, त्यामुळे समस्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोण आनंद झाला! एरव्ही पुरवठा खात्यातील लाचखोरी, नांदगावचे जमीन प्रकरण, येवल्यातील वाळू तस्कर व बागलाणच्या शेतकऱ्यांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून महसूल विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात चांगलीच जुंपलेली असताना व त्यातून पुन्हा थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लाचलुचपतने धडक दिल्याची बाब तशी महसूल खात्याला खटकली होतीच, परंतु त्यातही संबंधित अधिकाऱ्याने दाखविलेल्या चाणाक्ष बुद्धीचेही सर्वत्र कौतुक केले गेले. अगदी दारापर्यंत पोहोचलेल्या लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याची बाब महसूल खात्याच्या मानात शिरपेच टाकणारी तर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला खाली मान घालायला लावणारी असल्याची चर्चाही यानिमित्ताने झडली. परंतु महसूल खात्याने हुरळून जाण्याचे की, लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानेही एखाद्या अपयशाने खचून जाण्याचे कारण नाही. कारण लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आजवर टाकलेले वा रचलेले सापळे (?) सर्वच यशस्वी झाले असे कधीच घडले नाही व महसूल खाते पैसे खातच नाही, असा छातीठोक दावाही कोणी करू शकणार नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे की, सापळा फसला की फसवला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अनेक सापळे जसे तक्रारदाराच्या चुकीमुळे अपयशी ठरतात, तसेच ते बऱ्याच वेळा लाच मागणाऱ्याच्या समयसुचकतेने यशस्वीदेखील ठरत नसतात. अशा वेळी लाचलुचपत खात्याला हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नसतो हे जरी खरे असले तरी, काही सापळ्यांबाबत पाळलेली कमालीची गुप्ततादेखील संरक्षण खात्याची गोपनीय माहिती फुटावी तशी बाहेर फुटते. लाचेचा सापळा फसल्याने त्याबाबतची माहिती कशी व कोणी फोडली याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक खाते आत्मपरीक्षण करीत असेल तर कोणाची हरकत नसण्याचे कारण नसावे, पण तक्रार दाराव्यतिरिक्त फक्त तपासी अधिकाऱ्याशिवाय कोणालाही कर्णोपकर्णी तशी खबर नसण्याची पुरेपूर खबरदारी घेणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची गोपनीयता भंग होत असेल व त्यातून लाचखोरांना अभय मिळण्याची असेल तर दोषी कोण? मुळात सरकारी यंत्रणेकडून कायदेशीर कामासाठी पैशांची मागणी केली जात असेल व निव्वळ मागणी पूर्ण होत नसल्यामुळेच जर काम अडविले जात असेल तरच कोणतीही व्यक्ती लाच द्यायला व त्याबाबतची तक्रार करायला धजावत असते,त्यामुळे तक्रारदाराकडून या गोपनीयतेचा भंग होणे अशक्यच असते, शिवाय लाचलुचपत खाते तक्रारदाराचा जबाब त्याच्याच स्वहस्ताक्षरात लिहून त्यावरच त्याची जबाबदारी निश्चित करीत असते, त्याचबरोबर तक्रारदार देत असलेल्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी रंगीत तालीमही करून घेत असते. अगदी सापळा यशस्वी होईपर्यंत सरकारी पंचांनादेखील या कारवाईपासून अनभिज्ञ ठेवले जाते अशी कडेकोट खबरदारी घेत असताना सापळा अयशस्वी होत असेल तर शंका कोणावर घेणार? लाचलुचपतमध्येही कीड लागली असा अर्थ त्यातून कोणी काढला तर? असो. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यावर लावलेला सापळा तूर्त टळला आहे. हा सापळा टाळला गेला याची माहिती त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्यात मात्र लाचलुचपत प्रतिबंधक खाते यशस्वी झाले आहे, तसे नसते तर या सापळ्याची चर्चा महसूल खात्यात होणे अशक्यच होते.