पालिकेत दीड हजारांवरून अधिक जागा रिक्त
By Admin | Updated: February 28, 2017 02:12 IST2017-02-28T02:11:01+5:302017-02-28T02:12:21+5:30
नाशिक : महापालिकेत दर महिन्याला सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आणि वाढत्या लोकसंख्येच्या आधारे लागणारे वाढीव कर्मचारी याचा विचार केला तर महापालिकेत १६३३ कर्मचाऱ्यांची गरज आहे

पालिकेत दीड हजारांवरून अधिक जागा रिक्त
नाशिक : महापालिकेत दर महिन्याला सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आणि वाढत्या लोकसंख्येच्या आधारे लागणारे वाढीव कर्मचारी याचा विचार केला तर महापालिकेत १६३३ कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसे आस्थापना विवरण पत्र सोमवारी (दि.२७) स्थायी समितीने मंजूर केले. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यासाठी चाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेचे आस्थापना विवरणपत्र दरवर्षी स्थायी समितीवर मंजूर करून घ्यावे लागते. त्यानुसार यंदा समितीच्या अखेरच्या बैठकीत आस्थापना विवरण पत्र मांडून ते मंजूर करून घेण्यात आले. नाशिक महापालिकेत एकूण सात हजार ९० कर्मचारी पदे मंजूर आहेत. तथापि, दरवर्षी सेवानिवृत्त होणारे कर्मचारी बघता सध्या महापालिकेत केवळ पाच हजार ४३४ कर्मचारी आहेत. आणखी १ हजार ६३३ कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, असे नमूद करण्यात आले. सध्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तसेच सेवानिवृत्ती वेतन यासाठी ३४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
दरम्यान, गंगापूर येथे मलनिस्सारण केंद्र बांधण्यासाठी ३१ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. महापालिकेचे हे केंद्र व्हावे यासाठी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हा विषय गाजत आहे. विशेष म्हणजे महापालिकेने या केंद्रासाठी नियोजित जागा ताब्यात आली नसताना केंद्र बांधण्याच्या कामाच्या निविदा पाच वर्षांपूर्वीच काढल्या होत्या. त्या मंजूरही झाल्या होत्या. त्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर हा विषय वादात सापडला होता. (प्रतिनिधी)