अधिकाधिक रुग्ण बरे होण्यातून दिलासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:15 IST2021-05-09T04:15:54+5:302021-05-09T04:15:54+5:30
नाशिक : कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असला तरी ९० टक्के रुग्ण बरे होत आहेत, कोरोनाला घाबरून न जाता ...

अधिकाधिक रुग्ण बरे होण्यातून दिलासा !
नाशिक : कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असला तरी ९० टक्के रुग्ण बरे होत आहेत, कोरोनाला घाबरून न जाता एक युद्ध म्हणून पुढे जायचे आहे. कोरोनाचा प्रसार प्रत्येकाने आपापल्या परीने रोखतानाच अधिकाधिक रुग्ण बरे होण्यावर भर देणे आवश्यक आहे, अशा शब्दात डॉ. अतुल वडगावकर यांनी समाजाला आश्वासित केले. नाशिकमध्ये ओपन क्लिनिकची संकल्पना मांडून असंख्य रुग्णांना दिलासा देणारे डॉ. वडगावकर डिजिटल वसंत व्याख्यानमालेत बोलत होते.
स्व. माधवराव काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आठवे पुष्प गुंफताना डॉ. वडगावकर यांची ‘कोरोना, शंका आणि समाधान’ या विषयावर सुनेत्रा महाजन-मांडवगणे यांनी मुलाखत घेतली. यादरम्यान वडगावकर यांनी नागरिकांच्या मनातील प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. कोरोनामुळे जगण्याची व्याख्या बदलली असून, त्यामुळे पृथ्वीवरील जिवांना मोठी झळ बसलीय, सूक्ष्म स्वरूपातील हा विषाणू शिंक, खोकल्याद्वारे पसरून शरीरात जातो आणि पुढे तो संक्रमित होतो. मात्र, त्याचे स्वरूप कळण्यास विलंब होत असल्याने रुग्ण वाढत असल्याचे डॉ. वडगावकर यांनी स्पष्ट केले. रुग्णास लक्षणे दिसल्यास बेड शोधण्यापूर्वी त्यास ऑक्सिजनची व्यवस्था करून दिल्यास फायदेशीर ठरेल, असे सांगितले. होम कवारंटाइन असताना स्वतःचा डॉक्टर स्वतःच होण्याची गरज असून, आजाराचा संसर्ग इतरांना होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे; पण त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्लाही महत्त्वाचा असल्याचे डॉ. वडगावकर यांनी सांगितले. प्रत्येकाने लस घेणे आवश्यकच आहे, त्यात शंका घेऊ नये, लस घेतल्यावर आजार झालाच तर त्याचे स्वरूप सौम्य असेल. लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीतून संसर्ग वाढण्याची भीती डॉ. वडगावकर यांनी व्यक्त केली. रुग्णांची भीती कमी व्हावी म्हणून, तसेच संसर्ग वाढू नये म्हणून ओपन क्लिनिक सुरू केल्याचे सांगून डॉ. वडगावकर यांनी दीड वर्ष रुग्णांवर उपचार करूनही संकटापासून दूर असल्याचे सांगितले. याप्रसंगी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मंडलेश्वर काळे, धनंजय काळे उपस्थित होते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर संगीता बाफना यांनी आभार मानले.
आजचे व्याख्यान - स्वामी अद्वैतानंद
विषय - आनंदी जीवनाचे रहस्य
-----------------
फोटो
०८डाॅ. वडगावकर