वाहनतळांच्या कामांना महिनाअखेर मुदत
By Admin | Updated: July 22, 2015 01:25 IST2015-07-22T01:25:44+5:302015-07-22T01:25:56+5:30
वाहनतळांच्या कामांना महिनाअखेर मुदत

वाहनतळांच्या कामांना महिनाअखेर मुदत
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा शाहीस्नानाची पर्वणी महिन्यावर येऊन ठेपलेली असतानाही नाशिक शहरात करण्यात येणाऱ्या बाह्य व अंतर्गत वाहनतळांवर वीज, पाणी, स्वच्छतागृहांची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने ही कामे ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी काळात येणाऱ्या भाविकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विभागीय आयुक्त व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांनी बाह्य व अंतर्गत वाहनतळांचा दौरा करून पाहणी केली. त्यात प्रामुख्याने राजूर बहुला, विल्होळी, मुंबई-आग्रा महामार्गावरील ट्रक टर्मिनल, महामार्ग बसस्थानक, दिंडोरी वाहनतळ, निलगिरीबाग अंतर्गत बसस्थानक, आडगाव नाका वाहनतळ आदि भागांचा दौरा करण्यात आला. मोठ्या वाहनतळाच्या भागात वैद्यकीय पथकांसोबत अत्यावश्यक बाब म्हणून दोन खाटांची व्यवस्था करण्यात यावी जेणे करून या ठिकाणी रुग्णांवर तातडीचे उपचार करता येतील. त्याचबरोबर दिंडोरी वाहनतळ परिसरात पाण्यासाठी पाइपलाइन आणि विद्युत खांब उभारण्याचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
वाहनतळ व बसस्थानकाच्या भागात भाविकांना सुलभतेने हालचाल करता यावी आणि त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आदेश डवले यांनी दिले. यानंतर या सर्व अधिकाऱ्यांनी कन्नमवार पुलाखाली तयार करण्यात आलेल्या नवीन घाटाचीही पाहणी करून घाट परिसर स्वच्छतेच्या, सुशोभिकरणाच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)