अगोदर पैसे; नंतर निकाल !
By Admin | Updated: April 30, 2017 01:59 IST2017-04-30T01:59:19+5:302017-04-30T01:59:51+5:30
नाशिक : वार्षिक शैक्षणिक शुल्कापैकी काही रक्कम शिल्लक राहिल्यास खासगी शाळाचालकांकडून मुलांसह पालकांना निकाल देण्यासही नकार दिला जात आहे

अगोदर पैसे; नंतर निकाल !
नाशिक : वार्षिक शैक्षणिक शुल्कापैकी काही रक्कम शिल्लक राहिल्यास शहरातील काही खासगी शाळाचालकांकडून सर्रासपणे मुलांसह पालकांना निकाल देण्यासही नकार दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जोपर्यंत विद्यार्थ्याची संपूर्ण फी भरली जात नाही तोपर्यंत त्याला व त्याच्या पालकांना निकाल जाणून घेण्याचा जणू अधिकारच नसल्याचा अजब कारभार शहरात सुरू आहे.
शहरातील उपनगरीय भागामध्ये असलेल्या मराठी, उर्दू, इंग्रजी, सेमी-इंग्रजी या माध्यमांच्या विनाअनुदानित खासगी शाळा चालविणाऱ्या संस्थांनी जणू मुलांना त्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घ्यायचा अधिकारच हिरावून घेतला आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे अर्धवट भरलेले शैक्षणिक शुल्क. बहुतांश मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या सधन कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यांच्या तुलनेत गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांमधून आलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. यामुळे अनेकदा मुलांच्या पाल्यांकडून निम्मे शुल्क शाळेमध्ये भरले जाते व उर्वरित रक्कम शिल्लक ठेवली जाते. दरम्यानच्या काळात अनेकदा शिक्षकांकडून मुलांद्वारे ‘चिठ्ठ्या’ पाठवून शुल्क मागणीचा तगादाही लावला जातो. काही अडीअडचणींमुळे पालकांकडून उर्वरित शुल्क भरण्यासाठी विलंब होतो आणि वार्षिक परीक्षाही उलटून निकालाचा दिवसही उजाडतो. यादिवशी मुले मोठ्या आशेने व उत्सुकतेने आपले निकालपत्रक घेण्यासाठी शाळेची वाट पालकांसोबत धरतात; मात्र शाळेत गेल्यानंतर ‘निकाल मिळणार नाही किंवा सांगितलाही जाणार नाही’ हे शब्द कानी पडतात आणि त्याचा थेट परिणाम बालमनावर होतो; मात्र याचे संस्थाचालकांसह त्या शिक्षकांनाही कुठलेही सोयरसुतक नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. यामुळे मुलांसह पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तोंडी निकालही शिक्षकांकडून सांगणे टाळले जाते. त्यामुळे आपण उत्तीर्ण झालो की अनुत्तीर्ण झालो हे अनेकांना समजत नाही. याचवेळी काही मुले मात्र आनंदाने हातात निकालपत्रक घेऊन पालकांसोबत जात असल्याचे चित्रही त्यांच्या नजरेस पडते. (प्रतिनिधी)