कोळगावला युवतीचा विनयभंग
By Admin | Updated: May 29, 2014 16:29 IST2014-05-29T00:01:38+5:302014-05-29T16:29:42+5:30
महाविद्यालयीन १६ वर्षीय युवतीचे चार युवकांनी अपहरण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन

कोळगावला युवतीचा विनयभंग
कोळगाव : येथील महाविद्यालयीन १६ वर्षीय युवतीचे चार युवकांनी अपहरण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग करण्यासह तीला मारहाणही करण्याची घटना २६ मेच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याबाबत लासलगाव पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार रात्री ११ च्या सुमारास ही युवती बाथरूमसाठी घराबाहेर आली असता संदीप एकनाथ कडाळे, योगेश बबन कडाळे व सोमनाथ आणि गणेश कडाळे या संशयितांनी या युवतीला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टाकून तिचे अपहरण केले. संशयितांनी या युवतीला एक किलोमीटर अंतरावरील शेतात नेऊन तिचा विनयभंग केला. या युवतीने संशयितांच्या डोळ्यात माती फेकत घटनास्थळावरुन पलायन करत स्वत:चे घर गाठले. झालेला प्रकार तीने तीच्या पालकांना कथन केला. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी शाळेत जातानाही याच युवकांकडून त्रास दिला जात होता, असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर) लासलगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण करीत आहेत. संशयितांना न्यायालयाने ३० मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.