दस्तऐवजात फेरफार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:27 IST2016-03-16T08:27:27+5:302016-03-16T08:27:36+5:30
दस्तऐवजात फेरफार

दस्तऐवजात फेरफार
नाशिक : बांधकाम व्यावसायिका-सोबत अर्थपूर्ण व्यवहार करून जमिनीच्या सरकारी दस्तऐवजात भूमिअभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फेरफार करून फसवणूक केल्याची तक्रार जमीनमालक हुकूमत वालेचा यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे़ भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांसह बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही वालेचा यांनी केली आहे़
पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार अशोका मार्गावरील सर्व्हे नंबर ८५४/४ ही मिळकत कौतिक साठे, खंडू पैठणकर व हुकूमत वालेचा यांनी मूळ मालकांकडून २०१३ मध्ये विकत घेतली़ १९८० पासून ते २००३ पर्यंतच्या प्रती व नकाशे खरेदीदारांकडे होते़ मात्र खरेदीनंतरच्या नकाशाच्या प्रती मिळाव्या यासाठी त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयाकडे वालेचा यांनी अर्ज केला़
मात्र खरेदीनंतर अशोका रोडकडील ईश्वर पॅराडाईज या इमारतीचे बांधकाम व्यावसायिक शंकर सामनानी यांनी वालेचा यांच्या जागेवर रस्ता बंद करून बेकायदेशीररीत्या उद्यान व पार्किंग बनविले़ तसेच ग्राहकांकडून त्या मोबदल्यात पैसेही घेतले आहेत़
सामनानी यांनी मिळकतीची कागदपत्रे भूमी अभिलेखकडे सादर केली नाही़ असे असतानाही बांधकाम व्यावसायिकासोबत अर्थपूर्ण व्यवहार करून भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षक अजय कुलकर्णी, उपअधीक्षक भगवान भोये, संधानशिव शिरस्तदार, मुख्यालय सहायक देशमुख आदि कर्मचाऱ्यांनी चौकशी करून जागेचे सर्व नकाशे रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय दिला़ (प्रतिनिधी)