गुंडांना एकीकडे मोक्का, तर दुसरीकडे ‘मौका’सुद्धा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:59+5:302021-07-07T04:17:59+5:30
नाशिक पोलीस आयुक्तपदाची सूत्रे दीपक पाण्डेय यांनी हाती घेतल्यानंतर प्रारंभी पोलीस दलामध्ये कोरोनामुळे पसरलेली भीती आणि त्यांचे खालावलेले मनोबल ...

गुंडांना एकीकडे मोक्का, तर दुसरीकडे ‘मौका’सुद्धा...!
नाशिक पोलीस आयुक्तपदाची सूत्रे दीपक पाण्डेय यांनी हाती घेतल्यानंतर प्रारंभी पोलीस दलामध्ये कोरोनामुळे पसरलेली भीती आणि त्यांचे खालावलेले मनोबल उंचाविण्यावर भर दिला. कोरोनावर सहज मात शक्य असून, उपचारासाठी पोलिसांची हेळसांड होणार नाही याबाबतचा विश्वास पोलीस दलात निर्माण केला. सुरुवातीपासूनच कोरोना अन् प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर त्यांनी भर दिल्याने आयुक्तालयात सकारात्मक भावना होती. ‘मला कोरोना होणार नाही अन् झाला तर मला काही होणार नाही’ असा विचारही त्यांनी पोलीस दलात रुजविला. यानंतर हळूहळू पाण्डेय यांनी पोलीस ठाण्यांमध्ये मुक्काम ठोकण्यास सुरुवात केली. सराईत गुन्हेगारांची ‘हिस्ट्री’ तपासून त्यांना तडीपार करण्याचे फर्मानही अधिकाऱ्यांना सोडले.
संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हेगारांच्या टोळ्यांवर ‘मोक्का’ची कारवाई तयारी करीत तसे आदेशही पाण्डेय यांनी काढले. अवघ्या सहा महिन्यांत आयुक्तालयाच्या हद्दीत एक-दोन नव्हे तर पाच टोळ्यांच्या मोक्का कायद्याखाली मुसक्या आवळल्या. खून, सामूहिक बलात्कार, दरोडा, टोळीयुद्धातून हाणामारी, दंगलीसारखे गुन्हे करणाऱ्या सुमारे १०८ गुन्हेगारांवर मोक्का लावला. मोक्काची कारवाई करताना पाण्डेय यांनी लँडमाफियांच्या एका टोळीच्याही आनंदवलीच्या वृद्ध भूधारकाच्या खुनाच्या गुन्ह्यात मुसक्या बांधल्या. या कारवाईने शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले.
प्रत्येक गुन्हेगार हा सराईतच असतो असे नाही, तर काहींच्या हातातून अनवधानानेही गुन्हे घडून गेलेले असतात. अशा गुन्हेगारांना सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगारीचे समूळ उच्चाटनही शक्य आहे, यामुळेच पाण्डेय यांनी गुन्हेगार सुधार योजना अलीकडेच आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू करीत गुन्हेगारांना एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या योजनेचा लाभ गुन्हेगारांना आपले जीवन सुधारण्यासाठी होणार असून, त्यांच्यावर लागलेला ‘डाग’ पुसण्याकरिता हा शेवटचा पर्याय असल्याने आतापर्यंत २५० गुन्हेगारांनी पोलिसांच्या या संधीचा फायदा करून घेण्याचा निर्णय घेत आपले वर्तन सुधारणार अन् गुन्हेगारीचा मार्ग सोडणार, असे ‘बाँड’ लिहून दिले आहेत.
-अझहर शेख