मनसे पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: September 18, 2016 00:18 IST2016-09-18T00:13:24+5:302016-09-18T00:18:05+5:30
हालचाली : पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक सेना-भाजपाच्या वाटेवर

मनसे पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर
नाशिक : आतापर्यंत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोळा नगरसेवकांनी सेना-भाजपाला आपलेसे केले असतानाच आता पुन्हा एकदा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असून, काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागल्याने पक्षाच्या भवितव्याचा अंदाज बांधत काही नगरसेवकांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी सेना-भाजपात प्रवेश करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
गेल्या वर्षभरात महापालिकेतील सत्ताधारी मनसेला पक्षांतराचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. मनसेचे माजी महापौर यतिन वाघ यांच्यासह नगरसेवक सुरेखा नागरे, अरविंद शेळके, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश धोंगडे, रत्नमाला राणे, उषा शेळके, लता टिळे आणि मीना माळोदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.तर डॉ. दीपाली कुलकर्णी, वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी, माधुरी जाधव, अर्चना थोरात यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. नाशिकरोड येथील नीलेश शेलार व शोभना शिंदे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून मतदान केल्याने त्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले. त्यानंतर दोन्ही रिक्त जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. आता महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून येत्या १० आॅक्टोबरला प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार असून त्याचवेळी प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट होणार आहे. पोटनिवडणुकीत सेना-भाजपाने घेतलेली मते पाहता सत्ताधारी मनसेच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी मनसेत मोठी फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामध्ये काही पक्षपदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. सेना-भाजपाचे पदाधिकारी मनसेच्या काही नगरसेवकांच्या संपर्कात असून, नवरात्रोत्सवात प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचे सीमोल्लंघन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.