मनसेत संघटनात्मक फेरबदलाचे संकेत
By Admin | Updated: April 25, 2017 02:32 IST2017-04-25T02:32:33+5:302017-04-25T02:32:33+5:30
नाशिक : ‘आता पुन्हा पराभव पाहायचा नाही’ असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेत फेरबदलाचे संकेत मिळत आहे

मनसेत संघटनात्मक फेरबदलाचे संकेत
नाशिक : ‘आता पुन्हा पराभव पाहायचा नाही’ असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेत संघटनात्मक फेरबदलाचे संकेत मिळत असून, पक्षापासून दुरावलेल्यांना पुन्हा परतण्याची साद घालण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार, काही पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतण्याची चिन्हे असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेना-भाजपात जाऊनही पराभवाचा सामना करावा लागलेले काही पराभूत नगरसेवकही मनसेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचा सर्वाधिक तडाखा राज ठाकरे यांच्या मनसेला बसला होता. मनसेच्या ४० पैकी ३० नगरसेवकांनी सोईनुसार सेना-भाजपा तसेच कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यात भाजपाकडून रुची कुंभारकर, शशिकांत जाधव, अर्चना थोरात, संगीता गायकवाड, डॉ. दीपाली कुलकर्णी व सतीश सोनवणे, तर सेनेकडून रमेश धोंगडे, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयमाला पडली. यशवंत निकुळे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी रूपाली निकुळे या भाजपाकडून निवडून आल्या. मात्र, गणेश चव्हाण यांच्या पत्नी जयश्री चव्हाण, माधुरी जाधव, माजी महापौर यतिन वाघ, गुलजार कोकणी, विजय ओहोळ, अशोक सातभाई, शीतल भामरे व जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या वाट्याला पराभव आला होता. वंदना शेवाळे, सुनीता मोटकरी, हरिष लोणारी व रेखा बेंडकुळे यांना तर पक्षांतर करूनही तिकीट नाकारण्यात आले होते. महापालिका निवडणुकीत शिल्लक दहा पैकी आठ नगरसेवकांनी मनसेकडून निवडणूक लढविली होती. त्यातील माजी महापौरांसह तिघा नगरसेवकांनाच पुन्हा विजय संपादन करता आला तर अन्य दोन नवखे सदस्य निवडून आले. आता महापालिका निवडणूक आटोपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून पक्षस्तरावर महापालिकेतील पराभवाचे चिंतन केले जात आहे. त्यातच राज ठाकरे यांनी संघटनात्मक फेरबदलाचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, सध्या प्रदेश उपाध्यक्षपद भूषवित असलेल्या राहुल ढिकले यांच्याकडील शहराध्यक्षपद माजी आमदार नितीन भोसले यांच्याकडे पुनश्च दिले जाण्याची शक्यता असून पक्षापासून दुरावलेले माजी प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांनाही पक्षात परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.