ग्रामीण भागातही मत अजमावणार मनसे

By Admin | Updated: July 28, 2014 00:41 IST2014-07-27T23:18:11+5:302014-07-28T00:41:49+5:30

ग्रामीण भागातही मत अजमावणार मनसे

MNS to oppose voting in rural areas | ग्रामीण भागातही मत अजमावणार मनसे

ग्रामीण भागातही मत अजमावणार मनसे

 

संजय पाठक
नाशिक : राज ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री व्हायचे म्हटल्यानंतर जे नाही ते करायला मनसैनिकांनी सज्ज व्हावे म्हटले तर ते एकार्थाने योग्यच आहे. तथापि, केवळ इच्छा असून मार्ग कसा निघणार, हा प्रश्न आहे. नाही म्हटले तरी गेल्या विधानसभेपेक्षा आता ग्रामीण भागात पक्ष पोहोचला आहे आणि इच्छुकही तयार होऊ घातले आहेत. जेथे प्रबळ इच्छुक नाही, तेथे प्रबळ दावेदारही शोधण्याचे काम सुरू आहे. शिंक्याचं तुटलं आणि बोक्याचं फावलं ही अन्य पक्षांप्रमाणेच मनसेचीही अवस्था असून, अन्य पक्षांतील नाराज गळाला लावले जाण्याची शक्यता आहेच. साहजिकच कधी नव्हे इतक्या जागा प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही लढण्याची मनसेने तयारी केली आहे.
राज ठाकरे आणि नाशिकचे समीकरण शिवसेनेपासून सुरू झाले आणि ते आजही कायम आहे. शिवसेनेत असताना राज ठाकरे यांना नाशिकचा सुभा शिवसेनाप्रमुखांनी बहाल केला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. त्या अनुषंगाने राज ठाकरे यांची नाळ नाशिकशी जोडली गेली. मनसे स्थापनेपूर्वी राज यांनी नाशिकमध्येही मत अजमावणी केल्याने ती अधिक दृढ झाली. मनसे स्थापन झाल्यानंतर पहिल्याच महापालिका निवडणुकीत या पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आल्याने दणदणीत सुरुवात झाली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मनसे निवडणुकीला सामोरी गेली त्यावेळी पक्षाला नाशिकमधून जणू घबाडयोग लागला. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मागे टाकून पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत मनसेचे उमेदवार निवडून आले. पारंपरिक पक्षांना धूळ चारल्याने मनसेचा दबदबा वाढला. त्याला अधिक पुष्टी मिळाली ती दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत! या निवडणुकीत मनसेला नागरिकांनी चाळीस जागांवर कौल देऊन सत्तेच्या समिप आणले आणि नंतर मनसेने (भाजपाच्या मदतीने) सत्ताही मिळवली. दरम्यान, भगूर असो की त्र्यंबक अशा वेगवेगळ्या नगरपालिका तसेच जिल्हा परिषद याठिकाणीही मनसेला यश मिळाले. परंतु यश मिळवणे सोपे असले, तरी टिकवणे त्याहून कठीण असल्याची प्रचिती मनसेला गेल्या लोकसभा निवडणुकीत आली. नाशिकमधील उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांची अनामत रक्कम जप्त झाल्याने मनसेला धक्का बसला. तो अन्य पारंपरिक पक्षांनाही बसला असल्याचे आणि मोदी लाटेचे निमित्त केले गेले असले, तरी विजयी उमेदवार, दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले डॉ. प्रदीप पवार यांच्यातील मताधिक्याने मनसे किती पिछाडीवर पडली याची कल्पना आली. महापालिकेतील सत्ता संपादनानंतर ज्या पद्धतीने नाशिकच्या विकासाचे स्वप्न दाखवून राज ठाकरे यांनी नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या, त्या साऱ्याच फोल ठरल्याचे आणि राज्यात अन्य मतदारसंघांतही त्याचाच फटका बसल्याचे स्पष्ट झाले. साहजिकच राज यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नाशिकमध्ये अनेकदा दौरे करून चूक सुधरवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि आता याच पार्श्वभूमीवर मनसे दुुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. ही निवडणूक ग्रामीण भागातही प्रतिष्ठेची केली जाणार आहे हे विशेष. पक्षाने ग्रामीण भागातही लक्ष घातल्याचे सबुत राज यांच्या ब्लू प्रिंट मध्ये असणार आहेत.
गेल्या वेळी पूर्व, मध्य आणि पश्चिम अशा तीन मतदारसंघांत मनसेने यश मिळवले असले, तरी प्रत्यक्षात सात मतदारसंघांत ही निवडणूक लढविली होती. देवळाली मतदारसंघासह चांदवड-देवळा, निफाड आणि इगतपुरी-त्र्यंबक अशा सर्वच मतदारसंघांत पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यावेळी मनसे नवीन पक्ष होता. शिवाय ग्रामीण भागात जम बसला नव्हता, असे पक्षाचे म्हणणे आहे. तथापि, आता मात्र मनसेची चांगली ओळख निर्माण झाली आहे. साहजिकच शहरातील चार मतदारसंघांबरोबरच ग्रामीण भागातही लढण्यासाठी मनसेने उमेदवारही तयार केले आहेत. त्यामुळे चांदवड-देवळा, निफाड, येवला, इगतपुरी-त्र्यंबक, नांदगाव-मनमाड, दिंडोरी-पेठ, सिन्नर आणि नाशिक शहरातील चार मतदारसंघांत तयारी केली आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे हे कोणालाही वाटते; परंतु मनसेने नाशिकमध्ये ‘मिशन १०’ म्हणजे जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांपैकी दहा जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी पक्षाने ऐनवेळी ज्या मतदारसंघात अन्य पक्षातील प्रबळ इच्छुक गळाला लावता येतील त्याची तयारी केली आहे. येत्या काही दिवसांत अन्य पक्षांतील अनेक नेत्या-कार्यकर्त्यांचे प्रवेश सोहळे होणार आहेत. एकंदर कोणत्याही पक्षाशी युती न करता ‘एकला चलो रे’ म्हणणारा पक्ष अन्य पक्षांतील नाराजांची मदत घेणार, हे निश्चित.

Web Title: MNS to oppose voting in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.