MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज्यात शिक्षक, शेतकरी, असे अनेकांचे प्रश्न आहेत. प्रत्येक गोष्टीचे राजकीय लोक राजकारण करतात. मात्र जनतेचे हित जपले गेले पाहिजे. कुंभमेळा काही वर्षांवर आलेला असतांना शासन म्हणते कामे झाली. पण दिसत नाही. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळेल पण शहरातील उद्ध्वस्त झालेले प्रकल्पही नव्याने सुरू होतील. बरे झाले आम्हाला नाशिककरांनी नाकारले. त्यानिमित्ताने का होईना त्यांना कळले सत्ता हातात असलेल्यांनी दत्तक शहराची काय अवस्था केली, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज नाशिकमध्ये उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चापूर्वी पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. शेतमालाला भाव, पीक विमा असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षकांचा प्रश्न अजून सुटला नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण बाळा नांदगावकर यांनी यावेळी करून दिली.
राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक
राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. नाशिकवर राज ठाकरे यांचे प्रेम कायम आहे. मधल्या काळात नाशिककरांच प्रेम काहीस कमी झालेले असले तरी राज ठाकरे यांचे प्रेम कमी झालेले नाही. नाशिकचा विकास होत नाही, मग स्वतःला कर्तबगार समजणारे गिरीश महाजन काय करत आहेत, अशी विचारणा नांदगावकर यांनी केली. नाशिक दत्तक घेऊन काय केले? नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली. नाशिकचे लोक तुम्हाला विचारत आहेत की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचे काय झाले? अनेक प्रकल्प नाशिकमध्ये साकारण्यात आले. परंतु, ते प्रकल्प आज उद्ध्वस्त झाले जबाबदार कोण? असा प्रश्न बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला.
दरम्यान, नाशिक महापालिकेची पूर्ण सत्ता आमच्या ताब्यात नव्हती, तरी राज ठाकरेंनी चांगली कामे केली. राज ठाकरेंनी केलेली कामे तरी टिकवली का? आज त्या प्रकल्पांची काय अवस्था आहे? लोकांनी आम्हाला नाकारले तेही चांगले केले. कारण, ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी काय केले, हे लोकांना कळले, या शब्दांत बाळा नांदगावकर यांनी निशाणा साधला.