मनसे भाजपासोबत; विरोधकांना झटका
By Admin | Updated: May 20, 2017 02:22 IST2017-05-20T02:21:51+5:302017-05-20T02:22:27+5:30
नाशिक : तौलनिक संख्याबळाच्या आधारे विरोधकांकडून स्थायी समितीसह अन्य विविध विषय समित्यांमध्ये भाजपाची कोंडी करण्याचा डाव आखला गेला आहे

मनसे भाजपासोबत; विरोधकांना झटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तौलनिक संख्याबळाच्या आधारे विरोधकांकडून स्थायी समितीसह अन्य विविध विषय समित्यांमध्ये भाजपाची कोंडी करण्याचा डाव आखला गेला असतानाच मनसेने प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेसह विरोधकांना मोठा झटका बसला आहे. मनसेच्या या निर्णयामुळे विरोधकांचे संख्याबळ आता ५६ वरून ५५ वर आले असून, शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकाही निरर्थक ठरणार आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ६६ जागांवर विजय संपादन करत बहुमत मिळविले. त्याखालोखाल शिवसेना - ३५, कॉँग्रेस - ६, राष्ट्रवादी - ६, मनसे - ५, अपक्ष - ३ आणि रिपाइं - १ असे बलाबल राहिले. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने स्थायी समितीसह महिला बालकल्याण, शिक्षण समिती तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या विधी, आरोग्य व शहर सुधार समित्याही भाजपाच्याच ताब्यात राहणार होत्या. परंतु, विरोधकांनी एकत्र येत भाजपाला समित्यांवर सहजासहजी ताबा मिळवू द्यायचा नाही, अशी व्यूहरचना आखली आणि विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीची खेळी खेळली गेली. कॉँग्रेससोबत अपक्ष विमल पाटील, राष्ट्रवादीसोबत अपक्ष गुरुमित बग्गा, तर मनसेसोबत अपक्ष मुशीर सय्यद यांची गटनोंदणी केली गेली, तर शिवसेनेने रिपाइंसोबत एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला. ाागील पंचवार्षिक काळात मनसेसोबत पहिली अडीच वर्षे भाजपाने संसार केला होता. त्यात भाजपाला उपमहापौरपदासह अन्य समित्यांवरही संधी मिळाली होती. मनसेला केलेल्या उपकाराची परतफेड प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने केल्याचे मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी सांगितले असले तरी मनसेला जाळ्यात ओढत भाजपाने विरोधकांवर मात करण्याची ही मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. भाजपाने महापौर-उपमहापौरपदासाठी सव्वा वर्षांचा कालावधी पक्षस्तरावर निश्चित केला आहे. मनसेला सव्वा वर्षांसाठी उपमहापौरपदाचे गाजर दाखविले गेल्याची चर्चा रंगली आहे. याशिवाय, अन्य समित्यांवरही मनसेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महिला व बालकल्याण, शिक्षण समिती तसेच विषय समित्यांवर तौलनिक संख्याबळानुसार मनसेचा एकही सदस्य जाऊ शकणार नाही, परंतु भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाच्या कोट्यातून मनसेच्या पाच सदस्यांसह सहयोगी अपक्षाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.