अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी मनपातर्फे सात गुन्हे दाखल
By Admin | Updated: January 17, 2016 00:37 IST2016-01-17T00:35:50+5:302016-01-17T00:37:09+5:30
अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी मनपातर्फे सात गुन्हे दाखल

अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी मनपातर्फे सात गुन्हे दाखल
नाशिक : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शहरात अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या होर्डिंग्जविरुद्ध मोहीम तीव्र केली असून, गेल्या १५ दिवसांत १२ होर्डिंग्ज जप्त करत ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, महापालिकेने सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवून अनधिकृत फलक न उभारण्याचे आवाहन केले असून, सोबत न्यायालयीन आदेशाची प्रतही पाठविली आहे.
महापालिकेने येत्या २६ जानेवारीला ‘नो होर्डिंग्ज डे’ पाळण्याचे ठरविले असून, संपूर्ण शहर अनधिकृत होर्डिंग्जमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार, विभागीय कार्यालयांमार्फत होर्डिंग्जविरुद्ध मोहीम राबविली जात असून, दि. १ ते १५ जानेवारी या कालावधीत १२ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सात जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यातील पूर्व विभागातील तीन, पश्चिममधील तीन आणि पंचवटीतील एकाचा समावेश असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. दरम्यान, ज्याठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज उभे राहत असतील त्यांची माहिती कुणी नावानिशी अथवा निनावीही कळविल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय तक्रारदाराने संबंधित फलकाचे छायाचित्र काढून ते महापालिकेच्या मोबाइल अॅप्सवरही पाठविल्यास तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. संबंधितांनी अधिकृत परवानगी घेऊनच फलक उभारावेत, असे आवाहनही बहिरम यांनी केले आहे.