आमदार पडल्या आणि उद्योजकाचा वाद पेटला; शुक्रवारी राज्यातील उद्योग बंदचे आवाहन
By संजय पाठक | Updated: May 31, 2023 19:07 IST2023-05-31T19:06:38+5:302023-05-31T19:07:17+5:30
धनंजय बेळे यांच्या कारखान्यावर हल्ला करण्यात आल्याने शुक्रवारी राज्यस्तरावर उद्येाग बंदची हाक देण्यात आली आहे.

आमदार पडल्या आणि उद्योजकाचा वाद पेटला; शुक्रवारी राज्यातील उद्योग बंदचे आवाहन
नाशिक : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या उद्योजक संघटना असलेल्या निमा या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजपच्या आमदार सीमा हिरे या अनावधनाने एकाचा धक्का लागल्याने खाली पडल्या नंतर त्या तेथून निघून गेल्या खऱ्या परंतु त्यानंतर राजकारण वाढले असून आयेाजक असलेल्या निमा संस्थेच्या अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कारखान्यावर हल्ला करण्यात आल्याने शुक्रवारी राज्यस्तरावर उद्येाग बंदची हाक देण्यात आली आहे.
पंधरवाड्यापूर्वी नाशिकमध्ये निमा पॉवर या प्रदर्शनाचे आयोजन सातपूर येथे करण्यात आले होते. उद्याेग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत असताना आपल्या मतदार संघात कार्यक्रम होत असल्याने आमदार सीमा हिरे या स्वत:हून या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. दरम्यान फित कापण्याच्या वेळी त्यांना एकाचा धक्का लागल्याने त्या कोसळल्या. नंतर तेथून त्या निघून गेल्या परंतु संयेाजकांनी त्यांना परत बोलवण्याची किंवा चौकशी करण्याची तसदी घेतली नाही म्हणून हिरे समर्थक संतप्त झाले. त्यानंतर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या विरोधात सोशल मीडियावर निषेधाचाी मोहिम सुरू झाली. विशेष म्हणजे सीमा हिरे आणि धनंजय बेळे हे दोघेही भाजपाचेच आहे.
दरम्यान प्रदर्शन सुरू असतानाच काही जणांनी अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या धनंजय बेळे यांच्या कारखान्यावर हल्ला करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. आता त्यावरून नाशिकमधील निमा आणि आयमा या दोन्ही उद्योग संस्थांनी शुक्रवारी (दि.२) राज्यातील उद्येाग बंदची हाक दिली आहे.