मकरंदवाडी सोसायटीत गैरव्यवहार

By Admin | Updated: June 29, 2014 00:46 IST2014-06-28T22:25:01+5:302014-06-29T00:46:28+5:30

मकरंदवाडी सोसायटीत गैरव्यवहार

Mischief in Makrandwadi Society | मकरंदवाडी सोसायटीत गैरव्यवहार

मकरंदवाडी सोसायटीत गैरव्यवहार

 नाशिक : देवळा तालुक्यातील मकरंदवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत झालेल्या बोगस कर्जवाटप प्रकरणांबाबत देवळा येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर सोसायटीच्या विद्यमान संचालकांसह संस्थेच्या सभासदांनी सुरू केलेले उपोषण सहायक निबंधकांनी १५ दिवसांच्या आत योग्य ती चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे गत ५ ते ६ वर्षांपासून मकरंदवाडी वि.का. सोसायटीत मोठ्या प्रमाणात बोगस कर्जवाटप करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी व संचालक मंडळाने संगनमताने आठ ते नऊ फार्म हाऊससाठी कर्जवाटप केले आहे. प्रत्यक्षात तिथे कोणतेही फार्म हाऊसचे बांधकाम झालेले नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. फार्म हाऊससाठी दिलेले लाखो रुपयांचे कर्ज आज रोजी थकबाकीत असल्याने संस्था तोट्यात आहे.
संस्थेच्या काही संचालकांकडे इतर बँकांचे कर्ज असताना संचालक मंडळाने त्यांच्या संचालक मंडळीच्या सदस्यांना संस्थेचे दुहेरी कर्ज दिलेले आहे. या सर्व कारणांमुळे संस्था मोठ्या प्रमाणात थकबाकीत आहे. नियमित कर्जवाटपामुळे संस्था बंद पडावयाच्या स्थितीत आहे. मागील पाच ते सहा वर्षांत वाटप झालेल्या सर्व मध्य मुदत व पीककर्जाची चौकशी करून संबंधित बँक अधिकारी व संचालक मंडळावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हा उपनिबंधक, नाशिक, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक, सहायक निबंधक, देवळा आदिंना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, २ जून रोजीवरील निवेदनाच्या प्रति संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने मकरंदवाडी सोसायटीचे संचालक उद्धव अहेर, संस्थेचे सभासद दशरथ पूरकर, भाऊसाहेब भदाणे, कारभारी अहेर, भालचंद्र अहेर, पंडित पगार आदिंनी सोमवारी (दि. २३) सहायक निबंधक कार्यालय, देवळा येथे उपोषण सुरू केले. अखेर सहायक निबंधक, देवळा यांनी १५ दिवसांच्या आत बोगस कर्ज प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.

Web Title: Mischief in Makrandwadi Society