दंड भरूनही गौणखनिजासाठी अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:26 IST2018-11-05T00:25:49+5:302018-11-05T00:26:07+5:30
नाशिक तहसील कार्यालयाने शहराच्या विविध भागांत अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमानुसार दंडाची भरपाई करून घेतली असली तरी, गेल्या तीन आठवड्यांपासून दंड भरूनही प्रांत अधिकाºयांकडून वाहने सोडली जात नसल्याने ऐन सणासुदीत व्यावसायिकांना प्रांत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.

दंड भरूनही गौणखनिजासाठी अडवणूक
नाशिक : नाशिक तहसील कार्यालयाने शहराच्या विविध भागांत अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमानुसार दंडाची भरपाई करून घेतली असली तरी, गेल्या तीन आठवड्यांपासून दंड भरूनही प्रांत अधिकाºयांकडून वाहने सोडली जात नसल्याने ऐन सणासुदीत व्यावसायिकांना प्रांत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. ग्रामीण भागातून दगड, वाळू, मुरुमाची चोरी करून त्याची अवैध वाहतूक करणाºयांच्या विरोधात महसूल विभागाने मोहीम हाती घेतली आहे. नाशिक तहसील कार्यालयाने गेल्या महिन्यात अशाच स्वरूपात सहा ते सात वाहनांवर थेट कारवाई केली. कुठल्याही प्रकारचा परवाना नसतानाही गौणखनिजाची वाहतूक करणारे वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात आणून उभे करण्यात आले आहेत. शासनाच्या गौणखनिज विषयक नवीन धोरणानुसार अवैध वाहतूक करणाºया वाहनांकडून पाच पट दंड व एक लाख रुपये वाहन दंड अशी दुहेरी कारवाई करण्याच्या सूचना असल्यामुळे तहसील कार्यालयाने वाहनचालकांना नोटिसा पाठवून दंड भरून घेतला. सदरचे वाहने सोडण्यास हरकत नसल्याचा दाखला देऊन त्याबाबतचे अंतिम अधिकार प्रांत अधिकाºयांना असल्याने त्यांच्याकडे अहवाल पाठविला. परंतु गेल्या तीन आठवड्यांपासून प्रांत कार्यालयाकडून सदरचे वाहने सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे.
वाहनचालक हैराण
लाखो रुपयांचा दंड भरूनही वाहन ताब्यात मिळत नसल्याने वाहनचालक दररोज कार्यालयाचे उंबरे झिजवित असून, लक्ष्मीपूजन तोंडावर आल्याने त्यांना त्यांची वाहने पूजा करण्यासाठी ताब्यात हवी आहेत. वाहने न सोडण्याबाबतचे कोणतेही ठोस कारण तहसील, प्रांत कार्यालयाकडून दिले जात नसल्याने वाहनचालक हैराण झाले असून, अशा प्रकारची वाहने अडविण्यामागे त्यांचा काही ‘हेतू’ आहे, अशी शंकाही बोलून दाखवित आहेत.