दूध, फळे भाजीपाल्याची वाहने रोखली

By Admin | Updated: June 2, 2017 00:17 IST2017-06-02T00:00:59+5:302017-06-02T00:17:43+5:30

दिंडोरी : सकाळी ६ वाजेपासूनच रस्त्यावर युवक शेतकऱ्यांनी जमा होत वाहनांची तपासणी सुरू केली व भाजीपाला, फळे व दूध वाहतुकीची वाहने रोखून धरली.

Milk and fruit vegetables | दूध, फळे भाजीपाल्याची वाहने रोखली

दूध, फळे भाजीपाल्याची वाहने रोखली

 लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : सकाळी ६ वाजेपासूनच दिंडोरीसह ठिकठिकाणी रस्त्यावर युवक शेतकऱ्यांनी जमा होत वाहनांची तपासणी सुरू केली व भाजीपाला, फळे व दूध वाहतुकीची वाहने रोखून धरली. कोणतेही नुकसान न करता वाहने बाजार आवारात लावण्यात आली त्यामुळे ठिकठिकाणी आंबे, भाजीपाला व दुधाचे ट्रक अडकून पडले आहेत.
नाशिक - सापुतारा रस्त्यावरील पालखेड चौफुलीवर शेकडो शेतकरी जमा होत त्यांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. यात तीन चार दुधाचे टँकर, तर आठ - दहा आंब्याचे ट्रक, एक टमाट्याची ट्रक अडवून ते बाजूला लावण्यात आले तर एक काळी पिवळी टॅक्सीत किरकोळ विक्रीस नेण्यात येणारे आंबे, चिक्कू, नारळ आदी विविध फळे जप्त करत ते रस्त्यावर फेकून देण्यात आले. उमराळे येथे पेठ तसेच गुजरातमधून आलेले पंधरा ते वीस आंब्याचे ट्रक परत पाठविण्यात आले.
रासेगाव, लखमापूर फाटा, उमराळे, पांडणे, वणी, खेडगाव, पिंप्रीअचला आदी ठिकाणी भाजीपाला, फळे, दुधाची वाहने रोखण्यात आली. तीनही प्रमुख राज्यमार्गावर ठिकठिकाणी वाहने रोखण्यात आली आहेत.
या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी युवा शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. काही काळ तणाव निर्माण होत पोलीस व शेतकऱ्यांमध्ये वादविवाद झाला. पोलिसांनी वाहतुकीला अडथळा न आणण्याची भूमिका मांडत, कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. यानंतर कार्यकर्त्यांनीही समजुतीची भूमिका घेत येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले.

Web Title: Milk and fruit vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.