सिडकोच्या पवननगर रस्त्यावर मध्यपींचा धिंगाणा; वाहनांवर फिरकावले दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 13:33 IST2018-02-11T13:31:18+5:302018-02-11T13:33:44+5:30
हा सर्व प्रकार घडत असताना पोलिसांना त्याचा मागमूस लागला नाही. टवाळखोरांच्या दगडफेकीमध्ये किरण जाधव यांच्या मोटारीचे नुकसान झाले.

सिडकोच्या पवननगर रस्त्यावर मध्यपींचा धिंगाणा; वाहनांवर फिरकावले दगड
नाशिक : सिडको परिसरातील उत्तमनगर-पवननगर रस्त्यावर मद्यपी टवाळखोरांच्या टोळक्याने धिंगाणा घालत रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये वाहनांच्या काचा फुटल्या. अचानकपणे सुरू झालेल्या धुडगूसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
सिडको परिसरात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्था ढासाळली असून पोलिसांचा वचक कमी झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मद्यपी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने घातलेला धुडगूस ते सांगण्यास पुरक आहे. टवाळखोरांच्या टोळक्याने हातात दगड, विटा घेऊ न वाहनांवर भिरकावले. त्यांनी सुरू केलेला हा दहशत माजविण्याचा प्रकार बघून कोणीही त्यांना हटकण्याची हिंमत केली नाही. हा सर्व प्रकार संध्याकाळच्या सुमारास घडत असताना पोलिसांना त्याचा मागमूस लागला नाही. टवाळखोरांच्या दगडफेकीमध्ये किरण जाधव यांच्या मोटारीचे नुकसान झाले.
त्यांनतर टवाळखोरांनी येथून पळ काढला. अनेक दिवसांपासून पवन नगर, उत्तम नगर रस्त्यावर असे प्रकार सुरु आहेत. मद्याच्या नशेत बेदरकारपणे वाहने चालवून तसेच रिक्षांमधील साऊंडसिस्टमचा दणदणाट करुन स्टंटबाजी या रस्त्यावर वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मद्यपी टोळक्यांच्या ओल्या पार्ट्या पवननगर मैदानावर राजरोसपणे रंगत असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे सिडकोवासियांचे म्हणणे आहे. परिसरात अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम हाती घेऊन टवाळखोर मद्यपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.