संवादातील दरी बिघडवते मानसिक स्वास्थ्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST2021-09-06T04:17:47+5:302021-09-06T04:17:47+5:30
नाशिक : मानव जमात हा समाजशील प्राणी मानला जातो. मात्र, कोरोनाच्या काळात जिथे घराबाहेर पडणेदेखील धोक्याचे मानले जात होते. ...

संवादातील दरी बिघडवते मानसिक स्वास्थ्य !
नाशिक : मानव जमात हा समाजशील प्राणी मानला जातो. मात्र, कोरोनाच्या काळात जिथे घराबाहेर पडणेदेखील धोक्याचे मानले जात होते. त्यामुळे अनेकांचा बाहेरच्या विश्वाशी प्रत्यक्ष संपर्कच तुटला. विशेषत्वे एकटे राहणाऱ्यांना तर या काळात संवाद साधणेही मुश्कील झाले. तर काही नागरिकांना कुटुंबातच असलेल्या विसंवादाने मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
मानसिक त्रास किंवा आजार हा बहुतांशी वेळा विविध कौटुंबिक, सामाजिक तणाव आणि आर्थिक अस्थिरता तसेच गरिबी, भेदभाव या कारणांमुळे होतो. मानसिक त्रास असलेल्या व्यक्तीस सामाजिक, कौटुंबिक आधाराची, कामाची आणि आर्थिक स्थिरतेची आवश्यकता असते, नुसत्या गोळ्या घेऊन मानसिक आजार बरा होत नाही. त्यामुळेच ज्याच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधता येईल, असे काही जिवलग कुटुंबात किंवा कुटुंबासह घराबाहेर असणे आवश्यक आहे. देशभर पसरत गेलेली कोविड-१९ ची महामारी आणि घालण्यात आलेले निर्बंध, त्यामुळे विस्कटलेली आर्थिक आणि सामाजिक घडी या सगळ्यांचाच मानसिक स्वास्थ्यावर गंभीर आणि खोलवर परिणाम झाला आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
या महामारीमुळे भीती, निराशा, हतबलता, अनिश्चितता, अविश्वास अशा सर्वच भावना वाढल्या आहेत. त्यातूनच प्रसारमाध्यमातून मिळणारी अतिमाहिती, गैरमाहिती, अफवा यामुळे मानसिक ताणतणाव अधिकच वाढत चालले आहेत. गेल्या ७ ते ८ महिन्यात- भीती, चिंता, निराशा, झोप न येणे, आरोग्याची अति काळजी वाटणे, भूक कमी होणे, थकवा येणे, वैफल्यग्रस्त वाटणे, कोरोना होईल अशी काळजी वाटत राहणे, आणि आत्महत्येचे विचार येणे अशा प्रकारची मानसिक त्रासाची लक्षणे दिसत आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीलाही नैराश्य आणि भीती, बेचैनीचा त्रास होत आहे, क्वारंटाईन राहिल्यामुळे किंवा राहायला लागेल या भीतीनेदेखील मानसिक त्रास वाढलेले दिसत आहेत.
इन्फो
ताणतणाव टाळण्याचे उपाय
अति ताणतणावाची लक्षणे असल्यास कोणाशी तरी बोलणे आणि मदत घेणे गरजेचे आहे.
आपल्या जीवनशैलीत आहार, काम, व्यायाम, झोप, आणि मित्रांशी व नातेवाईकांशी संपर्क ठेवणे या गोष्टी संतुलितरीत्या आणि शिस्तबद्ध रीतीने कराव्यात.
कोरोनाविषयक शंका असेल तर सरकारी माहिती आणि आरोग्य सेवा देणाऱ्या व्यक्ती, मानसोपचारतज्ज्ञांवरच विश्वास ठेवा.
प्रत्येकाने भूतकाळात ज्या कौशल्यांमुळे ताणतणाव हाताळण्यात मदत झाली आहे ते लक्षात ठेवून त्या कौशल्यांचा वापर करावा.
कामकाजाचे, ॲक्टिव्हिटीचे वेळापत्रक तयार करा आणि ते अमलात आणा.
कोट
महिनाभरानंतरही ताणतणाव आणि त्याची लक्षणे कमी होत नसल्यास, झोप आणि भूक खूप बिघडली असल्यास, काही शारीरिक त्रास, डोकेदुखी होत असल्यास, गंभीर मानसिक आजाराची लक्षणे, अतिसंशय, भास होत असल्यास जवळ उपलब्ध असलेल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे संपर्क साधणे आवश्यक आहे. -डॉ. हेमंत सोननीस
.