संमेलन २३ दिवसांवर, तरी कार्यक्रम पत्रिकेचा नाही पत्ता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:24+5:302021-03-04T04:26:24+5:30
नाशिक : साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याचे जाहीर होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. प्रत्यक्ष संमेलनाला अवघे ...

संमेलन २३ दिवसांवर, तरी कार्यक्रम पत्रिकेचा नाही पत्ता !
नाशिक : साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याचे जाहीर होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. प्रत्यक्ष संमेलनाला अवघे २३ दिवस बाकी असताना अजूनही संमेलनासाठीच्या कार्यक्रमाची पत्रिकाच जाहीर झालेली नसल्याने साहित्यरसिकदेखील संभ्रमात आहेत. त्यातच महामंडळाकडून उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात येणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाचे नावावर अद्यापही खलच सुरू असल्याने संमेलन नक्की २६ मार्चपासूनच होणार आहे का? अशी चर्चा साहित्य वर्तुळात रंगू लागली आहे.
साहित्य संमेलन म्हटले की, त्याचे परंपरेनुसार उद्घाटन होते. त्यातच गतवर्षापासून सुरू केलेल्या नवीन परंपरेनुसार आता उद्घाटक हा राजकारणी नव्हे तर साहित्यिकच पाहिजे, अशी महामंडळाची भूमिका असल्याचे ठाले पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मग राजकारणी नको तर कोणत्या ज्येष्ठ साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन करणार, त्याबाबत अद्यापही घोळात घोळ सुरूच असल्याचे समजते. एका ज्येष्ठ साहित्यिकाकडे विचारणा झाल्यानंतर त्यांनी नकार दिल्याचीही चर्चा आहे. मग त्यानंतरच्या अन्य पर्यायांपैकी उपलब्ध होऊ शकणाऱ्या कुणाही साहित्यिकाच्या नावावर शिक्कामोर्तब का झाले नाही, तेदेखील समजू शकलेले नाही. त्याशिवाय सर्वाधिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात कोणत्या मान्यवर कवींना निमंत्रित केले, त्यावरून कवी संमेलनाच्या दर्जाचा अंदाजदेखील रसिकांना बांधता येतो; मात्र त्या नावांबाबतही उलगडा करण्यात आलेला नाही. त्याशिवाय परिसंवादांचे विषय, वक्ते, बाल साहित्य संमेलनात सहभागी होणारे साहित्यिक कोण, त्याबाबतही इतका ‘सस्पेन्स’ राखण्याचे कारण काय? हाच साहित्यप्रेमींचा प्रश्न आहे. कार्यक्रम पत्रिका राज्यात, राज्याबाहेरील साहित्यप्रेमींना पोहोचली तर तीन दिवसांपैकी कोणत्या दिवशी यायचे, कोणत्या कार्यक्रमांना अवश्य उपस्थित राहायचे, त्याचा निर्णय घेऊन तसे ठरवून बाहेरगावाहून येणेदेखील त्यांना शक्य होते; मात्र अशाप्रकारचा सस्पेन्स हा साहित्य संमेलनाची उत्कंठा वाढवणारा नसून, रसिक प्रेक्षकांची गैरसोय करणारा ठरतोय, याचे भान आयोजक संस्था आणि महामंडळाने ठेवणे आवश्यक आहे.
इन्फो
लग्न ठरले, स्थळ ठरले, पण...
संमेलनासाठीची निश्चित रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सूतोवाच महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीरपणे केले होते. त्यानंतर गत महिन्यात ते पुन्हा नाशिकला आल्यानंतरही त्यांनी लवकरच कार्यक्रम पत्रिका जाहीर करणार असल्याचे जाहीर केले, तरी प्रत्यक्षात अजूनही ती जाहीर झालेली नाही. हे म्हणजे लग्न ठरले, स्थळ ठरले, वधू-वर ठरले, मुहूर्त जवळ आला तरी विवाहाला कुणाला बोलवायचे, लग्न रजिस्टर्ड करायचे की थाटामाटात, ते मात्र निश्चित ठरले नाही, अशीच अवस्था असल्याची चर्चा रंगत आहे.
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.