वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालये दत्तक घ्यावीत
By Admin | Updated: November 19, 2014 01:03 IST2014-11-19T01:00:12+5:302014-11-19T01:03:58+5:30
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालये दत्तक घ्यावीत

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालये दत्तक घ्यावीत
नाशिक : देशपातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, जिल्हा शासकीय रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. तसेच खासगी व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक रुग्णालय दत्तक घेऊन त्या रुग्णालयात दोन तास जनतेसाठी सेवा द्यावी, असे आवाहन आमदार डॉ. राहुल अहेर यांनी केले आहे. आमदार डॉ. राहुल अहेर यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय व संदर्भ सेवारुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या कामांची तसेच आवश्यक त्या गरजांबाबत भेट देऊन माहिती घेतली. जिल्हा रुग्णालयात एक्स-रे मशीन असूनही रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. तसेच ग्रामीण रुग्णालयांत रक्त संकलन केंद्रांमध्ये चार रक्तपिशव्यांवर पाचवी पिशवी राहत नाही. ती क्षमता वाढवावी, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना केल्या. तसेच चांदवड ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरची इमारत पूर्ण झाली असून, ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवून रुग्णालय व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना केल्या. आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुसज्ज असे २०० खाटांचे रुग्णालय तसेच मागील वेळी झालेली चेंगराचेंगरीची दुर्घटना पाहता अशी दुर्घटना घडलीच तर त्यासाठी सर्व प्रकारची सज्जता असण्याबाबतच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना केल्या. ग्रामीण भागातील रुग्णालयांमधून जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळण्यासाठी प्रत्येक वैद्यकीय अधिकारी व खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक रुग्णालय दत्तक घेण्याचे आवाहन आमदार डॉ. राहुल अहेर यांनी केले. (प्रतिनिधी)