जनतेच्या जिवाशी खेळतेय यंत्रणा

By Admin | Updated: August 14, 2016 21:56 IST2016-08-14T21:56:09+5:302016-08-14T21:56:51+5:30

जनतेच्या जिवाशी खेळतेय यंत्रणा

The mechanism of playing with the people | जनतेच्या जिवाशी खेळतेय यंत्रणा

जनतेच्या जिवाशी खेळतेय यंत्रणा

 स्थळ : सटाणा
वेळ : दुपारी २ वाजता
बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील गिरणा नदीपात्रावरील पूल ब्रिटिश राजवटीत बांधला गेला. ब्रिटिशांच्या पत्रव्यवहारानुसार त्याची मुदत बारा वर्षांपूर्वीच संपली आहे. तरीदेखील तग धरून आहे. महाडच्या घटनेनंतर जागरूक यंत्रणा म्हणून ठेंगोडा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा देखावा करण्यात आला; मात्र ज्या पुलावरून जाताना बांधकाम विभागाने कमकुवत पूल असल्याची चेतावणी दिली आहे त्या ताहाराबादच्या मोसम नदीपात्रावरील पुलावरून क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या जड वाहनांना मज्जाव केला जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सत्तरच्या दशकात बागलाण तालुका तसा दुर्गम म्हणूनच ओळखला जात होता.
दळणवळणाच्या माध्यमातून या भागाचा विकास होईल म्हणून प्रशासनाने ताहाराबादच्या मोसम नदीवर १९६४ मध्ये पूल बांधण्यात आला. २००६-०७ पर्यंत हा पूल सुस्थित होता. परंतु सोग्रस ते दहीवेल पर्यंतच्या विंचूर-प्रकाशा मार्गाचे ‘‘बीओटी’’ तत्त्वावर रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे धुळेमार्गे जाणारी अवजड वाहतूक जवळचा मार्ग म्हणून यामार्गाने निघाली. वास्तविक संबंधित विभागाचे अवजड वाहतुकीबाबत सहा महिने सर्वेक्षण झाले होते. त्याच वेळी पुलाच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहतूक होत असल्यामुळे ताहाराबादच्या पुलाला समांतर पूल घेणे आवश्यक होते.
संबंधित यंत्रणेच्या या निष्काळजीपणामुळे दहा वर्षांच्या काळात चार ते पाच वेळा वाहतुकीला अडथळा आल्यामुळे पुलाची मलमपट्टी करण्यात आली आहे. वाहतूक इतकी मोठ्या प्रमाणात आहे की दर सहा महिन्यात पुलावरील डांबर उखडून खड्डे पडतात. त्या पडलेल्या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून पुलाला प्रचंड हादरे बसतात. या वारंवार होणाऱ्या प्रकारामुळे या पुलाला मोठमोठे तडे गेल्याचे उघडकीस आले आहे. कठडे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे केव्हाही दुर्घटनेस निमंत्रण मिळू शकते.१ औरंगाबाद-आहवा राज्य मार्गावरील अंतापूर ते हरणबारी दरम्यान रस्त्यावर नव्वदच्या दशकात बांधलेल्या चारही पुलांचे कठडे तुटले आहेत. तीच अवस्था हरणबारी धरणावरून जौतापूर, बोऱ्हाटे, मोहलांगी, शबरीधामकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी सांडव्यावर पूल बांधण्यात आला आहे; मात्र त्याच्या एका बाजूचे कठडेच नाहीत तर दुसऱ्या बाजूचे निखळून पडण्याच्या अवस्थेत आहेत. कठडे नसल्यामुळे वाहनचालकाला पुलाचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताला निमंत्रण आहे. तर दुसरीकडे या पुलाच्या दोन्ही बाजूंना अक्षरश: झाडे अवतरली आहे. वटवृक्ष, पिंपळ, निंबाचे मोठमोठी झाडे उगवली आहे. ही झाडे वेळीच न तोडल्यामुळे झाडांच्या मुळ्या बांधकामात घुसून पुलाला तडे गेले आहेत. वास्तविक दर सहा महिन्यात पुलाच्या आजूबाजूला उगवणाऱ्या झाडांची सफाई करणे आवश्यक असताना ती देखभाल कागदोपत्रीच होत असल्याचे दिसून येत आहे. हलगर्जीपणामुळे पूल कमकुवत होऊन तुटलेल्या कठड्याकडे दुर्लक्ष करून एकप्रकारे जनतेच्या जिवाशी खेळत असल्याचे भयावह चित्र आहे

Web Title: The mechanism of playing with the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.