डॅमेज कंट्रोलसाठी मनसेचे अॅप
By Admin | Updated: April 2, 2015 00:53 IST2015-04-02T00:49:29+5:302015-04-02T00:53:44+5:30
राज नाशकात दाखल : आज विविध कामांची पाहणी

डॅमेज कंट्रोलसाठी मनसेचे अॅप
नाशिक : महापालिकेत गेल्या तीन वर्षांच्या सत्ताकाळात चमकदार कामगिरी बजावू न शकलेल्या मनसेने आता दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला ओसरलेला करिश्मा पुनर्जीवित करण्यासाठी लोकसंपर्क वाढविण्याचे ठरविले असून, डॅमेज कंट्रोलसाठी अॅप विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचा औपचारिक शुभारंभ गुरुवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत पहिल्या अडीच वर्षांत भाजपाबरोबर संसार थाटणाऱ्या मनसेने नंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीशी घरोबा केला. महाराष्ट्रात प्रथमच महापालिका ताब्यात घेणाऱ्या मनसेकडून नवनिर्माणाच्या अपेक्षा केल्या गेल्या; परंतु तीन वर्षांत नाशिककरांची घोर निराशा झाली. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले. निवडणुकांनंतर मनसेचे खंदे शिलेदार पक्ष सोडून गेले. एकेक हादऱ्यांनी खिळखिळी झालेल्या मनसेने आता राष्ट्रवादीच्या साथीने प्रपंच सुरू ठेवला असला, तरी आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या महापालिकेच्या माध्यमातून नवनिर्माणाचे स्वप्न हे अधुरेच राहण्याची शक्यता आहे.