महाबळ चौकाचे नामांतर होणार नसल्याची महापौरांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:15 IST2021-01-25T04:15:21+5:302021-01-25T04:15:21+5:30
नाशिक : महात्मा गांधीरोडवरील टिळकपथ सिग्नल चौकाचे १९८२ पासून असलेला व्यायामाचार्य कृ. ब. महाबळ चौक हे नाव कायम राहील ...

महाबळ चौकाचे नामांतर होणार नसल्याची महापौरांचे स्पष्टीकरण
नाशिक : महात्मा गांधीरोडवरील टिळकपथ सिग्नल चौकाचे १९८२ पासून असलेला व्यायामाचार्य कृ. ब. महाबळ चौक हे नाव कायम राहील असे स्पष्टीकरण महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले आहे.
या चौकाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या गेल्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या महासभेत एका नगरसेवकाने सादर केला होता. मात्र, त्यामुळे व्यायामप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. व्यायामाचार्य महाबळ यांचे नाव १९८२ साली (कै) दादासाहेब केळकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्याची महापालिकेच्या दफ्तरी नोंद आहे. ब्रिटिशांच्या काळात शरीराने बळकट युवा पिढी घडविण्याचे काम व्यायामाचार्य महाबळ यांनी केले. अभिनव भारतचे शपथबद्ध कार्यकर्ते असलेल्या महाबळ यांना जॅक्सनच्या वधानंतर ब्रिटिशांच्या छळवणुकीला सामोरे जावे लागले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या कार्याची महत्ती असल्याने शासनाने त्यांना दोन एकर जागा व्यायामशाळेसाठी दिली आणि महाबळ यांनी आयुष्यभराची पुंजी या व्यायामशाळेसाठी लावली होती. आता बदलत्या काळात त्यांच्या कार्याची पुरेशी माहिती न घेताच चौकाचे नामकरण घाटत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर यासंदर्भात व्यायामप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत महापौर सतीश कुलकर्णी यांना निवेदन दिले होते. यानंतर महासभा पार पडली असली तरी एकदा या चौकाचे नामकरण झाले असल्याने पुन्हा नव्याने नाव दिले जाणार नाही. संबंधित नगरसेवकास पर्यायी चौक सुचविण्यास सांगण्यात येईल, असे महापौरांनी ‘लोकमत’ला सांगितले.