The mayor leaves the reservation tomorrow | महापौर आरक्षणाची उद्या सोडत

महापौर आरक्षणाची उद्या सोडत

नाशिक : राज्यात महाशिवराज्य आघाडीची तयारी सुरू झाल्यानंतर आता महापालिकेतदेखील सत्ता समीकरणाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने या आधीच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना प्रवेश देऊन तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काळात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महापौरपदासाठी उद्या (दि. १३) रोजी सोडत जाहीर होणार आहे.
नाशिक महापालिकेतील १२२ पैकी ६५ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे यापक्षाचे बहुमत आहे. शिवसेनेचे ३४ निवडून आलेले नगरसेवक असून, त्यांचा मुळातच भाजपला पाठिंबा नाही. मध्यंतरी शिवसेनेने बराच पाठपुरावा करून दोन विषय समित्यांचे उपसभापतिपद मिळवले असले तरी त्यानंतर मात्र भाजपने त्यांना महत्त्वाची पदे दिलेली नाही. दरम्यान, विधानसभा निवडणूक युतीने लढवित असतानादेखील भाजप-सेनेत विसंवाद दिसत होता. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या आणि त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसकडे जाऊन उमेदवारी मिळवून पराभूत झालेल्या बाळासाहेब सानप यांना शिवसेनेने प्रवेश दिला आहे. त्यावेळीच राज्यात भाजप आणि सेनेत वाद झाल्याने राजकीय वातावरण बदलले गेले आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या सत्तेवर होण्याची चिन्हे आहेत.
नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक १५ डिसेंबरच्या आता होणे बंधनकारक आहे. तथापि, अद्याप त्याबाबत आरक्षणाची सोडत निघालेली नाही. त्यानंतर मात्र राजकीय हालचाली गतिमान होत्या. महापालिकेत १२२ पैकी दिलीप दातीर आणि सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजीनामा दिल्याने एकूण १२० नगरसेवक आहेत. बहुमतासाठी ६१ नगरसेवकांची गरज आहे. भाजपकडे ६५ नगरसेवक असले तरी त्यातील काहीजण सानप समर्थक आहे, तर काहीजण सत्तेस असूनही कामे होत नसल्याने नाराज आहेत. अशा किमान सहा नगरसेवकांनी महाशिव आघाडीला साथ दिली, तर महापालिकेत सत्तांतर होऊ शकते. सध्या त्या दृष्टीनेच शिवसेना बघत आहे.
अनेकांची घरवापसी शक्य
राज्यात सत्तांतर झाले किंवा नाही झाले तरी स्थानिक पातळीवर सत्तांतर होऊ शकते. त्याचे कारण म्हणजे स्थानिक पातळीवरील आघाडी युती फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. त्यातच भाजप अंतर्गत खदखद असलेले अनेक नगरसेवक आता दोन वर्षांवर महापालिका निवडणुका आल्याने भूमिका बदलू शकतील. विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादीला अनुकूल वातावरण असल्याचे जिल्ह्यात दिसून आल्याने सध्या भाजपमध्ये असलेले मूळ कॉँग्रेस-राष्टÑवादीचे नगरसेवक पुन्हा कॉँग्रेस आघाडीकडे परतण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबल
एकूण निर्वाचित नगरसेवकांची सध्याची संख्या १२० आहे. बहुमतासाठी ६१ नगरसेवकांची गरज आहे. यात भाजपा- ६५, शिवसेना- ३४, कॉँग्रेस- ६, राष्टÑवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३, रिपाइं- १ याप्रमाणे आहे.

Web Title:  The mayor leaves the reservation tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.