नऊ नगरसेवकांमधून ठरणार महापौर

By Admin | Updated: February 4, 2017 23:18 IST2017-02-04T23:17:42+5:302017-02-04T23:18:00+5:30

कुणाची लागणार लॉटरी? : अनुसूचित जमातीसाठी आरक्षण

Mayor to be elected from nine corporators | नऊ नगरसेवकांमधून ठरणार महापौर

नऊ नगरसेवकांमधून ठरणार महापौर

नाशिक : नाशिक महापालिकेचे महापौरपद यंदा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने आगामी अडीच वर्षांसाठी अवघ्या नऊ नगरसेवकांमधून महापौर निश्चित होणार आहे. नऊ नगरसेवकांपैकी पाच महिला असणार आहेत. महापालिका निवडणुकीत कुणाची सत्ता प्रस्थापित होते, यानुसार संबंधित अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागेवरून निवडून येणाऱ्या नगरसेवकाच्या भाग्याचा फैसला होणार आहे. राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठी शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात नाशिकचे महापौरपद पुढील  अडीच वर्षांकरिता अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.  महापालिकेत ९ जागा या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. त्यात पाच जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे महापालिकेचा महापौर हा प्रभाग १, २, ४, ६, ८, ११, १६, २३ आणि २७ या नऊ प्रभागांमधीलच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपाने अनुसूचित जमाती या आरक्षित जागांसाठी नगरसेवक रंजना भानसी, राष्ट्रवादीतून भाजपात आलेले सुरेश खेताडे, प्रा. सरिता सोनवणे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, मनसेतून भाजपात दाखल झालेल्या नगरसेवक रेखा बेंडकुळे, वनिता लहारे, रुपाली थविल, रुपाली निकुळे व लता पवार यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेने, मनसेचे नगरसेवक व शिक्षण उपसभापती गणेश चव्हाण यांच्या पत्नी जयश्री चव्हाण, सिद्धेश्वर अंडे, वर्षा गिते, भाजपातून सेनेत गेलेले माजी नगरसेवक परशराम वाघेरे, राधा बेंडकुळे, माजी नगरसेवक सुभाष गुंबाडे, माकपातून सेनेत गेलेल्या नगरसेवक नंदिनी जाधव, रुपाली गांगुर्डे व चंद्रकांत खोडे यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीकडून या जागांवर राजश्री जाधव, कविता आव्हाड, लक्ष्मण म्हसे, अमोल काथे, कॉँग्रेसकडून सुरेखा बदादे, ऋषिकेश फुलकर, वैशाली गवळी, शोभा भोये व आशा तडवी तर मनसेकडून जयश्री पवार, विशाल कोळी, मंदा अढाणे, भाजपाचे माजी नगरसेवक जगन्नाथ तांदळे यांच्या पत्नी चित्रा तांदळे, योगेश शेवरे, हेमलता कडाळे, माजी नगरसेवक रंजना जोशी व लक्ष्मण वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे, या उमेदवारांमधून जे नऊ नगरसेवक विजयी होतील, त्यातील एकाच्या गळ्यात थेट महापौरपदाची माळ गळ्यात पडणार आहे. परिणामी, या नऊ प्रभागातील लढती या लक्षवेधी व महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. (प्रतिनिधी)
सेना - भाजपात रस्सीखेच
महापालिकेत स्वबळावर भाजपाचे कमळ फुलले तर भाजपाकडून आतापर्यंत चारवेळा निवडून गेलेल्या ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांचे नाव आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. भानसी यांना आजवर पक्षाकडून स्थायी समिती सदस्यत्व वगळता कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही. त्या खालोखाल प्रा. सरिता सोनवणे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे आणि रुपाली निकुळे यांचीही दावेदारी राहू शकते, तर सेनेकडून माजी नगरसेवक सुभाष गुंबाडे, परशराम वाघेरे, जयश्री चव्हाण आणि नंदिनी जाधव हे उमेदवार शर्यतीत राहतील. कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मनसेने आघाडी केल्यास त्यांच्याकडून चित्रा तांदळे, आशा तडवी, रुपाली गांगुर्डे ही नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात त्यासाठी त्यांना अगोदर नगरसेवक म्हणून निवडून यावे लागणार आहे.

Web Title: Mayor to be elected from nine corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.