नाशिकच्या माया सोनवणे, प्रियंका घोडके महाराष्ट्र संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:32+5:302021-03-04T04:26:32+5:30
नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयतर्फे आयोजित राष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिकच्या माया सोनवणे व प्रियंका घोडके ...

नाशिकच्या माया सोनवणे, प्रियंका घोडके महाराष्ट्र संघात
नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयतर्फे आयोजित राष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिकच्या माया सोनवणे व प्रियंका घोडके यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे, तर भावना गवळी यांची महाराष्ट्र संघाच्या सहायक प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली आहे.
फिरकीपटू माया ही मागील दोन हंगामापासून महाराष्ट्र संघ तसेच राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धेसाठी पश्चिम विभागाचेही प्रतिनिधित्व करीत आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना टी-ट्वेंटी स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याची जोरदार कामगिरी केल्यामुळेच मायाची पश्चिम विभागासाठीदेखील निवड होत आहे. प्रियंकानेदेखील मागील हंगामात महाराष्ट्रातर्फे २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या महिला संघाच्या प्रशिक्षक भावना गवळी हिची महाराष्ट्र संघाच्या सहायक प्रशिक्षक म्हणून मागील वर्षीप्रमाणेच यंदाही या राष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. वरिष्ठ महिला खेळाडूंसाठी ही राष्ट्रीय पातळीवरील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा ११ मार्चपासून सुरू होत आहे. एलिट सी गटात असलेल्या महाराष्ट्राचे सामने जयपूर येथे आयोजित केले आहेत. महाराष्ट्रासह या गटात आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा व चंदीगडचा समावेश आहे. क्रिकेटपटू माया सोनवणे व प्रियंका घोडके तसेच प्रशिक्षक भावना गवळी यांच्या निवडीबद्दल जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
फोटो
०३ माया सोनवणे
०३ प्रियंका घोडके
०३ भावना गवळी