'Maulee', a tattoo on the property of 'Concept'; Seal bank accounts | ‘माउली’, ‘संकल्पसिद्धी’च्या संपत्तीवर टाच; बॅँक खाती सील

‘माउली’, ‘संकल्पसिद्धी’च्या संपत्तीवर टाच; बॅँक खाती सील

ठळक मुद्देकारवाई : ३ कोटींच्या १० कार पोलिसांकडून जप्त

नाशिक : गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना त्यांच्या परताव्याची रक्कम न देता आर्थिक फसवणूक करणाºया माउली मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी व संकल्पसिद्धी प्रॉडक्ट कंपनीच्या संपत्तीवर शहर आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे. पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे ३ कोटी ३३ लाखांच्या दहा आलिशान कार जप्त करत २७ बॅँक खाती गोठविल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवार (दि. १५) पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई नाका पोलीस ठाण्यात आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१९ या कालावधीत संदीप भीमराव पाटील यांनी या दोन्ही कंपन्यांचे संचालक संशयित विष्णू रामचंद्र भागवत यांच्या बोलण्यावरून सुमारे ५३ लाख ४३ हजार १२० रुपये एवढी रक्कम गुंतविली होती. गुंतविलेल्या रकमेवर त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे पाटील यांनी मुंबई नाका पोलिसांकडे धाव घेऊन भागवत यांच्याविरुध्द अपहार करत फसवणुकीची फिर्याद दिली. फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्ह्णातील अपहाराची रक्कम ३ कोटी ८३ लाख ६८ हजार ३०८ रुपयांपर्यंत जाऊन पोहचली आहे.
भागवत याने ठेवीदारांना विश्वासात न घेता कृषी मंत्रालयाची कुठलीही परवानगी न मिळविता उज्ज्वलम अ‍ॅग्रो मल्टिस्टेट सोसायटीतील ठेवी माउली सोसायटीत वर्ग करून घेतल्या.

सात शहरांमधून कार जप्त
नाशिकसह मुंबई, सोलापूर, पुणे, जळगाव, अहमदनगर आदी जिल्ह्यांत कारवाई करत दहा महागड्या गाड्या जप्त केल्या. यामध्ये रेंज रोव्हर-४, टोयाटो फोर्च्युनर-३, हुंदाई क्र ेटा-१, टोयाटो इनोव्हा-१, फोर्ड एन्डीवेअर-१ आदी कारचा समावेश आहे. भागवत व त्याचे सोसायटी, इतर कंपन्यांशी संबंधित २७ बँक खाती गोठविण्यात आली आहे. त्या खात्यांमध्ये केवळ दहा लाखांची रक्कम शिल्लक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

महागड्या कारची खरेदी
संकल्पसिध्दी फर्म व प्रॉडक्ट इंडिया कंपनीद्वारे विविध योजनांचे आमिष दाखवत लोकांकडून गुंतवणूक करून घेतली. तसेच सोसायटीच्या ठेवी गोळा करणाºया एजंटांच्या नावे कर्जही काढून रेंजरोव्हरसारख्या महागड्या कारची खरेदी त्यांनी केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी राज्यातील विविध शहरांमध्ये पथके रवाना करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. भागवत व माउली मल्टीस्टेट सोसायटीविरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. तपास राज्य आर्थिक शाखेकडे सोपविण्याची मागणी ठेवीदारांकडून केली जात आहे.

खालील वाहने केली जप्त
रेंजरोव्हर (एम.एच १६ बीझेड ९९९९), रेंजरोव्हर (एम.एच ४५ एडी ९७२७), रेंजरोव्हर (एम.एच४२ एएक्स ०१००), फॉर्च्युनर (एम.एच.१२ आरएफ ००५४), फॉर्च्युनर (एम.एच१४ एचडी ८८९५) ही वाहने पुणे येथून पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच नाशिक येथून फोर्ड एन्डिवेअर (एम.एच.२० सीवाय ९९९९), फॉर्च्युनर (एम.एच ४२ एएक्स ७७२८), इनोव्हा क्रिस्टा (एम.एच १५ एफएफ ९९९९) जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच जळगाव येथून रेंजरोव्हर व ह्युंदायी क्रेटा या दोन मोटार जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना आरटीओ क्रमांक नसून चेसीज क्रमांकाची नोंद पोलिसांकडे आहे. या सर्व वाहनांचे मालक वेगवेगळे आहेत.

Web Title: 'Maulee', a tattoo on the property of 'Concept'; Seal bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.