Mastrinbai becomes CEO of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या सीईओ बनल्या मास्तरीणबाई
जिल्हा परिषदेच्या सीईओ बनल्या मास्तरीणबाई

ठळक मुद्देश्रीमती एस.भुवनेश्वरी यांनी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अंबोडे केंद्रातील कोळीपाडा या जिल्हा परिषदेच्या शाळेत अचानक भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली

सुरगाणा : शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राचा दुसरा दिवस. वेळ दुपारी सव्वा बाराची. शिक्षक नियमित कामकाजात व्यस्त. त्याचवेळी शालेय आवारात अचानकपणे चारचाकी वाहन येऊन धडकते. शाळेची जेमतेम तीसच्या आसपास पटसंख्या. गुरु जींच्या दुचाकी शिवाय चारचाकी गाडी कधी आलेली नाही. मुलांच्या नजरा गाडीकडे एकवटतात. त्या गाडीतून साधी राहणी असलेल्या बाई उतरतात अन् तडक वर्गात येऊन मुलांमध्ये बसतात. मास्तरीण बाईची भुमिका बजावतात. मग मुलांमध्ये कुजबूज सुरू होतेय. नवीन मास्तरीणबाई आल्यायं वाटतं.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती एस.भुवनेश्वरी यांनी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अंबोडे केंद्रातील कोळीपाडा या जिल्हा परिषदेच्या शाळेत अचानक भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी वाचन,लेखनाची पडताळणी स्वत: मुलांच्या गटात बसून केली.आदिवासी मुलांशी हिंदी,मराठी, इंग्रजी भाषेत संवाद साधत त्यांना शाबासकीही दिली. या भेटीत त्यांनी शैक्षणकि साहित्य पेटीचा वापर करीत इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांना अंक व संख्या ज्ञान, चित्रवाचन, चित्रावरून गोष्ट सांगणे आदींसह प्रश्न विचारत मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करीत त्यांना बोलते केले. आजचा दिवस काय म्हणून साजरा करतात ? आज कोणाची जयंती आहे ? पंडित नेहरु कोटीच्या खिशाला कोणते फुल आवडीने लावत, फुलांच्या बरोबरीने कोण आवडत असा प्रश्नांची अचूक उत्तरे मुलांकडून ऐकून त्या अवाक झाल्या. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मनखेड शाळेला भेट देत शालेय कामकाजाची पडताळणी केली. मुलांशी हितगुज साधत इतर शिक्षकांना मार्गदर्शन करीत कामात सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या.

Web Title:  Mastrinbai becomes CEO of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.