अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:03+5:302021-01-13T04:36:03+5:30
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील एकलहरा रोडवर सहा संशयितांनी एका तेरा वर्षे ...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील एकलहरा रोडवर सहा संशयितांनी एका तेरा वर्षे वयोगटांतील अल्पवयीन मुलीवर सामूहिकरीत्या अत्याचार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उशिरा घडली. आई-वडील मोलमजुरीच्या कामाला गेले असताना, दिवसभर घरात मुलगी एकटीच होती. जेव्हा संध्याकाळी आई घरी परतली असता, घरात मुलगी आढळून आली नाही. मुलीचा परिसरात शोध घेत असताना, ती भेदरलेल्या अवस्थेत एका घराच्या गच्चीवर आईला मिळून आली. आईने तिला दिलासा देत तत्काळ घरी आणले आणि विश्वासात घेऊन विचारले असता, तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर, रात्रीच्या सुमारास आईने नाशिक रोड पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. यानुसार, पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, तातडीने संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी शहर व परिसरात शोधमोहीम राबवित पहाटेपर्यंत या गुन्ह्यातील सर्व संशयितांना अटक केली. यामध्ये संशयित दीपक समाधान खरात (१९, रा.सिन्नरफाटा), रवी संतोष कुऱ्हाडे(१९, रा.पांडवलेणी), आकाश राजेंद्र गायकवाड (२४, रा. रेल्वे ट्रॅक्शन), सुनील निंबाजी काेळे (२४,रा.आम्रपाली झोपडपट्टी), सोमनाथ विजय खरात (१९, रा.गुलाबवाडी), पूजा सुनील वाघ (२७, रा.अरिंगळे मळा, एकलहरा रोड) यांचा समावेश आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नाशिक रोड पालीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सर्व संशयितांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने सहा दिवसांची शनिवारपर्यंत (दि.१६) पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी संशियत महिलेने संबंधित मुलांना सहकार्य केल्याचा संशय आहे.
---इन्फो--
या क्रूर घटनेचा सखोल तपास
नाशिकसारख्या शहरात घडलेल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या क्रूर आणि मानवी संवदेनांना हेलावून टाकणाऱ्या घटनेचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या गुन्ह्यामध्ये सहभागी सर्व संशयितांची कसून चौकशी करत असल्याचे उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले. पाच युवकांसह एका अल्पवयीन मुलाचा या गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे पुढे येत आहे, तसेच त्यांना प्रवृत्त करत चुकीची प्रेरणा दिल्याच्या संशयावरून महिलेलाही अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.