मास्कने लिपस्टीकची लाली घालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:40+5:302021-05-08T04:14:40+5:30
नाशिक : कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध, त्यामुळे बंद असलेले उद्योग-व्यवसाय तसेच कार्यालये आणि बहुतांशी गृहिणी आता घरीच ...

मास्कने लिपस्टीकची लाली घालवली
नाशिक : कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध, त्यामुळे बंद असलेले उद्योग-व्यवसाय तसेच कार्यालये आणि बहुतांशी गृहिणी आता घरीच असल्याने ब्युटी पार्लरमध्ये जाणेच जवळपास बंद झाले आहे. या काळात बाहेर कोणीच पडत नसल्याने ब्युटी पार्लर तसेच सौंदर्य प्रसाधने विक्रीचा व्यवसायही ठप्प झाला आहे.
कोरोनाचा विविध व्यावसायिकांना फटका बसला असून, त्यात ब्युटी पार्लरचाही समावेश आहे. बहुतांश महिलाच या व्यवसायात असून, अनेकांची लहान-मोठी दालने आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर राज्य शासनाने संपूर्णत: लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार तसेच शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प होते. जानेवारी महिन्यात काही प्रमाणात सर्व काही सुरळीत होत असल्याने पुन्हा एकदा ब्युटी पार्लर उघडली, परंतु नंतर पुन्हा निर्बंध लागू झाले. नियमित बाहेर पडणाऱ्या युवती आणि महिला अशा साऱ्याच घरी असल्याने सौंदर्य प्रसाधनांची मागणीही घसरली आहे. कोणीही घरातून बाहेरच पडत नसल्याने ब्युटी पार्लरला प्रतिसाद नाही आणि आता तर ब्युटी पार्लरच बंद असल्याने प्रश्नच उद्भवत नाही. अर्थात शहरातील सध्याची कोरोनाची स्थिती बघता, आरोग्य आधी मग सौंदर्य अशी महिलांची धारणा आहे. त्यातच आता लग्नसराई, सभा, समारंभ सारे काही ठप्प असल्याने अडचण झाली आहे.
इन्फो../ कोट
२४ तास घरातच, ब्युटी पार्लर हवे कशाला...?
कोरानाचा कहर इतका आहे की, अनेक ब्युटी पार्लर चालक महिलांनाही संसर्ग झाला होता. त्यामुळे आधी अशा महिलांचे कुटुंब महत्त्वाचे आहे. आमच्या कुटुंबातील हा सहव्यवसाय आहे. पतींचा स्वतंत्र उद्योग आहे त्यामुळे अडचण नाही. मात्र, अन्य महिला व्यावसायिकांचे हाल होत आहेत.
- फाल्गुनी शहा, ब्युटी पार्लर चालक
कोट...
सध्या लॉकडाऊनमुळे सर्व कामकाज ठप्प आहे. महिलाही बाहेर पडत नाहीत. मध्यंतरी सुरू झालेली लग्नसराईसुध्दा ठप्प असल्याने ब्युटी पार्लरचा विषयच येत नाही. सध्या आरोग्य महत्त्वाचे असल्याने महिला घराबाहेर पडत नाहीत.
- अर्चना शेलुकर, ब्युटी पार्लर चालक.
कोट...
वर्षभरापासून सौंदर्य प्रसाधनांची विक्री ठप्प आहे. मध्यंतरी जेमतेम महिनाभर ब्युटी पार्लर सुरू होते. त्यानंतर ते बंद झाले. आता लग्नसराईही बंद आहे. त्याचा एकूणच परिणाम अर्थकारणावर होत आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे आरोग्यविषयक काळजी महत्त्वाची आहे.
कोट...
सध्या शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये बंद आहेत. कोरोनामुळे कोणाचे ना कोणाचे नातेवाईक बाधित आहेत. अशावेळी सौंदर्य हा विषयच दूर आहे. आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य असेल तर पुढे अन्य विषय येतात. सध्यातरी महिलांना आरोग्य महत्त्वाचे आहे. सौंदर्य राखणे आणि सौंदर्य प्रसाधनांचा विचार दुय्यम आहे.
- सोनम रोकडे मोरे, नाशिक
कोट...
सध्या बाहेर पडणे शक्य नाही तसेच घरीच काम करावे लागत असल्याने महिला मेटाकुटीस आल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच महिला बाहेर पडतात. त्यामुळे सध्या ब्युटी पार्लर किंवा सौंदर्य प्रसाधने हा विषयच खूप दूर आहे.
- जयश्री पाठाडे, नाशिक