बाजार पुन्हा गजबजला
By Admin | Updated: June 10, 2017 01:58 IST2017-06-10T01:57:40+5:302017-06-10T01:58:05+5:30
नाशिक : शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव यांसह मागणीसाठी १ जूनपासून पुकारलेल्या संपादरम्यान भाजीपाला आणि दुधाचे भाव गगनाला भिडले.

बाजार पुन्हा गजबजला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव यांसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी १ जूनपासून पुकारलेल्या संपादरम्यान शहराचा भाजीपाला आणि दुधाचे भाव गगनाला भिडले. परंतु, नाशिकमध्ये ८ जूनला झालेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत शहराचा भाजीपाला व दूध पुरवठा शिथिल करण्याचा निर्णय झाल्याने शहरातील भाजीबाजारांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाज्यांचे भाव आटोक्यात येऊन सर्वसामान्य नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. परंतु, भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी काही विक्रेते अजूनही चढ्या भावानेच भाजीपाला विक्री करीत असल्याच्या प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
शेतकरी संपामुळे नाशिकमधील भद्रकाली, रविवार कारंजा, गोदाघाट परिसरासह सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी, उपनगर, नाशिकरोड आदी उपनगरांमध्येही भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे या भागांतील भाजीबाजारांमधील भाज्यांचे दर पूर्वपदावर आले आहेत. शेतकऱ्यांनी संप पुकारण्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांकडून भाजीपाल्याची अचानक मागणी वाढल्याने भाजीविक्रेत्यांनी दुप्पट तिप्पट नफा कमवून चढ्या दराने भाज्यांची विक्री केली, तर संप काळात भाज्यांचे भाव गगनालाच भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिले दोन दिवस भाजीपाल्याचे एकही वाहन शहरात आले नाही; मात्र आज व्यवहार सुरळीत झाले.