बाजार समिती सचिवांना धरले धारेवर
By Admin | Updated: April 30, 2017 01:57 IST2017-04-30T01:57:06+5:302017-04-30T01:57:15+5:30
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांची दिशाभूल केली जाते. याशिवाय कर्मचाऱ्यांवर कोणचाही अंकुश नाही, त्यातच बाजार समितीचे उत्पन्न घटले आहे.

बाजार समिती सचिवांना धरले धारेवर
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांची दिशाभूल केली जाते. याशिवाय कर्मचाऱ्यांवर कोणचाही अंकुश नाही, त्यातच बाजार समितीचे उत्पन्न घटले आहे. उपसमितीत पाहिजे तसे ठराव मांडून ते मंजुरीसाठी सभागृहात पाठविले जात असल्याच्या कारणावरून संतप्त संचालकांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना चांगलेच धारेवर धरले.
कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा उपसभापती श्याम गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत सचिव अरुण काळे यांचे कामकाज समाधानकारक नसून संचालकांची दिशाभूल करणारे असल्याने व त्यातच त्यांच्याकडून बाजार समितीच्या कामकाजाविषयी व्यवस्थितपणे माहिती दिली जात नसल्याने ते प्रशासकीय कामकाजात असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समितीची आर्थिक परिस्थिती खराब झाली असल्याचे पत्र संचालकांनी उपसभापतींना देत सदर विषय पुढील बैठकीत घेण्याबाबत चर्चा केली. बाजार समितीतील गाळे स्थलांतरित केलेले आहे.
बाजार समितीत यापूर्वी काही गाळेधारकांनी गाळ्यांसमोर पत्र्याचे शेड उभारले ते पैसे घेऊन उभारल्याचा आरोप संचालकांनी केला, तर कांदा, बटाटा व ज्या ठिकाणी हमाल मापारी काम करतात त्याठिकाणी शेड गरजेचे असल्याने ते ठेवावेत, अशी मागणी चंद्रकांत निकम यांनी केली. साखर सेवा शुल्क विषयी ठराव दिलेला नसताना त्या विषयावर सूचक म्हणून संचालक संदीप पाटील, तर अनुमोदक म्हणून जगदीश अपसुंदे यांची नावे टाकल्याचा धक्कादायक प्रकार अपसुंदे यांनी बैठकीत उघडकीस आणला.
बाजार समितीचे अरविंद जैन, दिगंबर चिखले व विजय निकम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने कारवाई केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी समिती नेमावी तसेच निकाल लागेपर्यंत त्यांचे निलंबन कायम ठेवावे, असा विषय मांडण्यात आला. उपसमित्या सोयीसाठी असल्याने त्या बरखास्त कराव्यात तसेच उपसमितीच्या कोणत्याही विषयावर आगामी कालावधित सह्या करणार नसल्याचे काही संचालकांनी सांगितले. बाजार समितीत नवीन गाळ्यांना परवानगी देऊ नये आदिंसह विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
बाजार समितीत झालेल्या या बैठकीला शंकर धनवटे, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, आर. टी. भोये, भाऊसाहेब खांडबहाले, युवराज कोठुळे, हंसराज वडघुले, सुनील खंदारे, शिवाजी चुंबळे, रूचि कुंभारकर, प्रवीण नागरे, संदीप पाटील, विश्वास नागरे, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार, प्रभाकर मळाणे, ताराबाई नार्वेकर, संपत सकाळे, विमल जुंद्रे आदि संचालक उपस्थित होते. (वार्ताहर)