लिलावासाठी बाजार समित्या सज्ज
By Admin | Updated: June 9, 2017 01:08 IST2017-06-09T01:08:14+5:302017-06-09T01:08:44+5:30
२४७ ट्रक भाजीपाला रवाना : आज व्यवहार सुरू

लिलावासाठी बाजार समित्या सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी सुकाणू समितीने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवत, त्यांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीत विक्रीसाठी माल आणण्याची मुभा दिल्यामुळे व्यवहारासाठी बाजार समित्या सज्ज झाल्या असून, सुकाणू समितीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर दूध व भाजीपाल्याची वाहतूक सुरळीत होऊन २४७ ट्रक रवाना करण्यात आले आहेत.
१ जूनपासून शेतकरी संपावर गेल्यामुळे जिल्ह्यातील सतरा बाजार समित्यांचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाले. शेतकऱ्यांच्या संपामुळे महाग झालेला भाजीपाला स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शुक्रवारपासून व्यवहार सुरू होणार आहेत. गुरुवारी यासंदर्भात घोषणा होताच, जिल्ह्णातून ६८ दुधाचे टॅँकर, ६३ ट्रक भाजीपाला, ८३ ट्रक कांदा व ३३ ट्रक अन्य माल रवाना करण्यात आला तसेच दुपारनंतर घोटी, नाशिक, नांदगाव, मनमाड, चांदवड या पाच बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांनी माल आणल्याने त्याचे लिलाव करण्यात आले. एका बाजार समितीत एका दिवसात ४० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याने गेल्या आठ दिवसांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे संपामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या शेतमालाचीही तोडणी न झाल्याने खराब होऊन नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी सुकाणू समितीने शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीची अनुमती दिल्याने आता बाजार समितीत मालाची आवक होण्याची व लिलाव पार पडण्यास सुरुवात होणार आहे.