भाषा संवर्धनासाठी मराठी शाळा आवश्यक

By Admin | Updated: February 28, 2017 02:28 IST2017-02-28T02:27:35+5:302017-02-28T02:28:01+5:30

मराठी भाषा वाचविण्यासाठी मराठी शाळा आवश्यक आहेत. आपण दुर्लक्ष करू नये, शासनाचे काही निर्णय घातक आहेत, भाषेचा अनुबंध राखला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी केले.

Marathi school requires language conservation | भाषा संवर्धनासाठी मराठी शाळा आवश्यक

भाषा संवर्धनासाठी मराठी शाळा आवश्यक

नाशिक : पांडुरंगाच्या दर्शनासाठी लोक पंढरीला जातात, तसे कुसुमाग्रजांच्या दर्शनासाठी लोक नाशिकला येत होते आणि अजूनही येतात. पूर्वी त्यांच्या सहवासात आनंद मिळत होता. आता त्यांच्या स्मृतीत आनंद मिळतो. कारण कुसुमाग्रजांनी ‘आनंद लोकाची निर्मिती’ या तीर्थक्षेत्री केली आहे. त्यांच्या वाङ्मयाचे गारुड आमच्या पिढीवर होते म्हणून आम्ही लिहू शकलो. आता त्यांच्यासारखी पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणणारी माणसे उरली नाहीत. मराठी मातीचा आणि भाषेचा गौरव करण्याची ताकद त्यांच्या कवितेत होती. त्यामुळेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे सर्वकालीन आणि समकालीन कवी आहेत, यानंतर मराठी भाषेचा मुद्दा मांडताना राजाध्यक्ष यांनी मराठी भाषा वाचविण्यासाठी मराठी शाळा आवश्यक आहेत. आपण दुर्लक्ष करू नये, शासनाचे काही निर्णय घातक आहेत, भाषेचा अनुबंध राखला पाहिजे, नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी केले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मराठी साहित्यातील सर्वोच्च अशा जनस्थान पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना राजाध्यक्ष बोलत होत्या. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर अशोक मुर्तडक, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह मकरंद हिंगणे, कोषाध्यक्ष डॉ. विनय ठकार, सहकार्यवाह अरविंद ओढेकर, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, गुरुमित बग्गा, विनायक रानडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी राजाध्यक्ष म्हणाल्या की, अगदी शालेय जीवनापासून माझे वाङ्मयक्षेत्राचे केंद्र कुसुमाग्रज हेच होते. त्या काळात रूजलेले हे वाङ्मयीन बीज आजही अंकुरत असून, फुलत आहे. तात्यासाहेबांच्या गावात आणि त्यांच्याच संस्थेच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार व सन्मान मी त्यांचा आशीर्वाद समजते. आज माझ्या मनात आनंद ओसंडून वाहत आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी सुखदा बेहेरे, हर्षद गोळेसर आणि सहकाऱ्यांनी ‘सरस्वतीच्या नौका, या युग यात्रेस निघाल्या’ हे कुसुमाग्रजांचे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मकरंद हिंगणे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा मांडला. तर विजया राजाध्यक्ष यांना प्रदान केलेल्या मानपत्राचे वाचन कवी किशोर पाठक यांनी केले. कार्यक्रमाचा समारोपदेखील कुसुमाग्रजांच्या ‘सर्वात्मका विश्वेश्वरा’ या गीताने झाला. कार्यक्रमास आमदार हेमंत टकले, माजी आमदार अ‍ॅड. विलास लोणारी, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, प्रकाश होळकर, लोकेश शेवडे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा अभिजात आहेच : कर्णिक
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा’ या विषयावर सरकारवर टीका केली. यावेळी कर्णिक म्हणाले की, आमच्या मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत तुकाराम तसेच कवी केशवसुत, कुसुमाग्रज, बालकवी, मर्ढेकर आदिंची परंपरा आहे. त्यामुळे आमची मराठी अभिजात आहेच. त्यामुळे भाषेला अभिजात दर्जा ही एक औपचारिकता असून, कोणतीही भाषा केवळ नवी जुनी यावरून अभिजात ठरत नाही तर तिची गुणवत्ता वाढविणे महत्त्वाचे आहे. आम्ही आमच्या पूर्वसुरी साहित्यिकांना नाकारले नाही. आता मात्र सर्व जुने नाकारण्याचे युग सुरू झाले आहे. आम्हाला उत्तम वाङ्मयाचा वारसा मिळाला असून, आम्ही लिहू शकतो. आपल्या मुंबईत अन्य सर्व राज्यांची ‘भाषा भवन’ आहेत, परंतु मराठी भाषा भवन नाही, ही खेदाची गोष्ट आहे. भाषा भवनाचा मी आग्रह धरला म्हणून आता त्याचे काम मंदगतीने तरी सुरू आहे. भाषा समृद्ध करणे हे मराठी भाषिकांच्या हातात असून, त्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नका. कारण साहित्यातील सरकारला फारसे काही कळत नाही, असेही कर्णिक म्हणाले.


शालेय जीवनात खाऊचे पैसे वाचवून घेतले ‘विशाखा’
नाशिक येथे आल्यावर माझ्या मनात शालेय जीवनातील मंतरलेले दिवस जागे झाले. त्याकाळात मला पुस्तक वाचनाची खूप आवड होती. कुसुमाग्रज हे तर माझे आवडते कवी. मला घरच्या लोकांनी बटाटेवडे व खाऊसाठी दिलेल्या पैशातून मी विशाखा हे पुस्तक घेतल्याची आठवण विजयाताई यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, या पूर्वीही मी अनेकवेळा नाशिक येथे आले तेव्हा सर्व प्रथम कुसुमाग्रजांना भेटले. त्यांचे घर सर्वांसाठी खुले होते. तेथे माणसांची वर्दळ होती. गप्पा होत होत्या. आजही मी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी गेल्यावर त्यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झाले. तेथे गेल्यावर माझे मन शांत झाले. माझ्या मनाला एकप्रकारे बळ मिळाले, असे सांगून राजाध्यक्ष म्हणाल्या की, त्यांची कविता ही तळपती तलवार होती. परंतु त्यांना प्रकाशझोत नको होता. त्यांची कवितेवर निष्ठा होती, कवितेशी त्यांनी करार केला होता. खरं म्हणजे कुसुमाग्रज या सूर्याच्या प्रकाशाची थोरवी पृथ्वीने गायली, अवघ्या जगाने गायली. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बालकवी यांच्या कवितांमध्ये स्वर्ग-भू मिलनाची कल्पना दिसते. यानंतर मराठी भाषेचा मुद्दा मांडताना राजाध्यक्ष यांनी मराठी भाषा वाचविण्यासाठी मराठी शाळा आवश्यक आहेत. आपण दुर्लक्ष करू नये, शासनाचे काही निर्णय घातक आहेत, भाषेचा अनुबंध राखला पाहिजे, नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती व्हावी, असेही राजाध्यक्ष यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Marathi school requires language conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.