दंगल, जाळपोळप्रकरणी मानूरचे १० युवक निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:13 IST2019-06-20T18:13:21+5:302019-06-20T18:13:35+5:30
न्यायालयाचा निकाल : तीन वर्षांपूर्वीची घटना

दंगल, जाळपोळप्रकरणी मानूरचे १० युवक निर्दोष
कळवण : येथील बेहडी पुलाजवळ परिसरातील १५० ते २०० युवकांच्या जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पोला अडवून त्याला आग लावून तेथे दहशत निर्माण करणे, जमावाला नियंत्रणात आणणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे, शासकीय कामकाजात हस्तक्षेप, जाळपोळ करणे या आरोपांतून मानूर येथील १० युवकांची सबळ पुराव्याअभावी कळवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
तीन वर्षापूर्वी मानूर येथील पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहासमोर झालेल्या टेम्पो व मोटारसायकल अपघातात मानूर येथील जगदीश पाटील या २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी घटनास्थळावरून टेम्पो चालक शरद डुकरे याने कळवणच्या दिशेने पळ काढल्याने शहराजवळील बेहडी नदीपुलाजवळ त्याला मारहाण करण्याच्या उद्देशाने जमावाने टेम्पो अडवला. टेम्पोला आग लावून दहशत निर्माण केली म्हणून कळवण पोलिसांनी मानूर येथील १० युवकांवर गुन्हा दाखल केला होता. कळवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती स्वरा पारखी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन या दहाही युवकांची कळवण पोलिसांनी दाखल केलेल्या दोन्ही प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.