उत्पादकांचे प्रयत्न : द्राक्षांपासून नवे उत्पादन सुरू करण्याची तयारी
By Admin | Updated: March 30, 2015 00:14 IST2015-03-30T00:13:28+5:302015-03-30T00:14:41+5:30
नाशकात आता वाइन-ब्रॅँडी साथ साथ

उत्पादकांचे प्रयत्न : द्राक्षांपासून नवे उत्पादन सुरू करण्याची तयारी
नाशिक
वाइन व्हॅली नाशिकमध्ये वाइनरींचा फुगा फुटल्यानंतर आता उत्पादकांना नवा आधार शोधावा लागला आहे. गारपीटग्रस्त द्राक्ष बागायतदारांना मदत देऊन आश्चर्यचकित करणाऱ्या वाइन उत्पादकांना आता या माध्यमातून तूर्तास लो रेंज वाइन निर्मिती करणार असल्याचे सांगितले असले, तरी दुसरीकडे मात्र ब्रॅँडी उत्पादनासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. शासनाने हात ढिला सोडल्यास आता वाइनच्या जोडीला ब्रॅँडीदेखील सुरू होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षांत सुरू झालेल्या वाइनरींचा फुगा बऱ्यापैकी फुटला आहे. शासनाच्या धोरणातील विसंगती आणि मुख्यत्वे हौस किंवा लाभ घेण्यासाठी म्हणून वाइन उद्योगात उड्या मारणाऱ्या उद्योगांची अवस्था चांगली नाही. म्हणून गेल्यावर्षी बेल आउट पॅकेजची मागणी करणाऱ्या उद्योजकांनी यंदा मात्र अचानक नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांसाठी हात पुढे केला आहे. नाशिकमध्ये गेले तिन्ही महिने अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे घायकुतीला आलेल्या द्राक्ष उत्पादकांची द्राक्षे खरेदी करण्याची तयारी नाशिकमधील वाइन उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दर्शवली आणि त्यांना हा प्रयोग इतका आवडला की, गारपिटीतून वाचलेली द्राक्षे बारामती, पुणे आणि सांगली येथील वाइन उत्पादकांना विकण्याची अभिनव कल्पना त्यांना सुचली आहे.
मुळात वाइनरीची द्राक्षे आणि खाण्याची द्राक्षे यात फरक आहे. वाइनरीसाठी वापरली जाणारी द्राक्षे वेगळ्या प्रजातीची आणि तुरट असतात. खाण्यासाठी वापरली जाणारी द्राक्षे गोड असतात. शर्करायुक्त द्राक्षांना आंबवणे शक्य नसल्याने वाइनसाठी वेगळ्या आणि तुरट चवीची द्राक्षे असतात. असे असताना वाइन उत्पादकांनी शर्करा असलेली द्राक्षे वाइनसाठी खरेदी करण्याबाबत दाखविलेल्या उत्सुकतेमागे वेगळेच कारण आहे. वाइनसाठी ती वापरून लो ेरेंज वाईन निर्मितीचा प्रयत्न आहे. परंतु त्यापलीकडे जाऊन द्राक्षांपासून निर्माण होणारी पर्यायी उत्पादने आणि विशेषत: ब्रॅँडी व्यवसाय सुरू करण्यासाठी हा आटापिटा सुरू असल्याचे दिसत आहे.
अखिल भारतीय वाइन उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी अहेर यांनी या द्राक्षापासून लो रेंज वाइन तयार केली जाईल असे सांगतानाच, द्राक्षापासून रस, तसेच ब्रॅँडी बनविण्याचा विचार असल्याचे नमूद केले. त्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न सुरू असून, शासनाने ब्रॅँडी परवाना देण्याचे धोरण सुलभ केल्यास हे शक्य आहे. त्यातून द्राक्ष उत्पादकांची अडचण दूर होईल, असेही ते म्हणाले.
मुळातच नाशिकमध्ये वाइन उद्योगाला चालना देण्यामागे शेतकऱ्यांचे हित हेच धोरण शरद पवार यांनी घोषित केले होते. नाशिकमध्ये निर्माण होणाऱ्या द्राक्षाला पुरेसा भाव न मिळणे आणि नैसर्गिक आपत्ती यावर मात करण्यासाठी द्राक्ष निर्माण होणाऱ्या नगरीत वाइन उद्योगाची बीजे रोवण्यात आली. परंतु त्यात ना द्राक्ष उत्पादकांना लाभ झाला ना उद्योजकांना फायदा, असे असताना आता पुन्हा एक नवा प्रयोग आकारायला आणायच्या हालचाली सुरू आहेत. वाइन उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने घेतले त्यावेळी महाराष्ट्र की मद्य राष्ट्र अशी विचारणा समाजातील जाणकारांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून वाइन धोरण राबविले; परंतु ब्रॅँडी निर्मितीसाठी पुन्हा असेच प्रोत्साहनात्मक धोरण राबविले, तर आता प्रश्न विचारण्याची गरज उरणार नाही.