मनपात एप्रिलमध्ये ६८ पदांसाठी भरती
By Admin | Updated: March 2, 2017 01:34 IST2017-03-02T01:33:58+5:302017-03-02T01:34:54+5:30
नाशिक : महापालिकेत एप्रिल महिन्यात वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्त्री अशा एकूण ६८ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.

मनपात एप्रिलमध्ये ६८ पदांसाठी भरती
नाशिक : महापालिकेत एप्रिल महिन्यात वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्त्री अशा एकूण ६८ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाणार असून, त्याबाबत महाआॅनलाइनशी चर्चा सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. याचबरोबर पदोन्नतीचाही प्रश्न मार्गी लावण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कामकाज पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेत कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या ही प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरली आहे. एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून येणारे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज आणि दुसरीकडे दरमहा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढती संख्या यामुळे प्रशासकीय कारभार चालविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाकडून नोकरभरतीला मान्यता नाही परंतु शासनाने वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्त्री या पदांच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार, एप्रिल महिन्यात ३२ वैद्यकीय अधिकारी, १९ कनिष्ठ अभियंता आणि १७ मिस्त्री यांची भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी महाआॅनलाइनशी चर्चा सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. दरम्यान, महापालिकेत अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपदही रिक्त झाले आहे. तसेच शहर अभियंता सुनील खुने यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या ९ मार्चला सुनील खुने निवृत्त होत आहेत.
शहर अभियंतापदही रिक्त होणार आहे. प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांचाही तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या ३ मार्चला संपत आहे. त्यामुळे प्रशासन उपआयुक्तपद रिक्त होणार आहे. या रिक्तपदांसाठीही शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा लागून आहे.
शहर अभियंतापदी विद्यमान अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता असून, त्यांच्या जागेवर कार्यकारी अभियंता गौतम पगारे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याचबरोबर महापालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे रोस्टर तपासून पदोन्नत्यांचाही प्रश्न निकाली काढण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)